विनापरवानगी स्मार्ट मीटर बसवल्यास काढून फेकून देऊ…

मालवण पंचायत समिती सभेत पं. स. सदस्य बंडू चव्हाण यांचा इशारा

मालवण : मालवण तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची परवानगी न घेता त्यांचे जुने वीज मीटर बदलून नवे स्मार्ट वीज मीटर लावले जात आहेत. या स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीज बिले येत असून वीज ग्राहक त्रस्त बनले आहेत. वीज अधिकाऱ्यांनी विनापरवानगी स्मार्ट मीटर लावू नयेत अन्यथा लावलेले स्मार्ट मीटर आम्ही लोकप्रतिनिधी काढून फेकून देऊ, असा इशारा पं. स. सदस्य बंडू चव्हाण यांनी मालवण पंचायत समितीच्या सभेत दिला.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी राजे सभागृहात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, तसेच पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, रिया बावकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, मानसी भोगावकर, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, बंडू चव्हाण आणि विविध शासकीय खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पं. स. सदस्यांनी स्मार्ट मीटरच्या विषयावरून आक्रमक होत मालवणचे अभियंता सचिन म्हेत्रे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मुख्यमंत्र्यांनीच परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत असे सांगितले असताना वीज अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय वीज मीटर कसे काय बदलतात ? असा सवाल यावेळी बंडू चव्हाण यांनी केला. यावर श्री. म्हेत्रे यांनी शासन निर्णयानुसार ग्राहकांची परवानगी नव्हे तर केवळ कल्पना देऊन वीज मीटर बसवायचे आहेत, स्मार्ट मीटरचे अनेक फायदे आहेत, ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचे निवारण आम्ही करत आहोत, असे सांगितले. यावर बंडू चव्हाण यांनी अधिकाऱ्यांनी सभेत स्मार्ट मीटरची जाहिरातबाजी करू नये, तुम्ही स्मार्ट मीटर बसवाच मग आम्हीही लोकशाही मार्गाने या विरोधात योग्य ती कार्यवाही करतो, असा इशारा दिला. ग्राहकांच्या परवानगी शिवाय वीज कंपनीने स्मार्ट मीटर लावू नयेत असा ठराव या सभेत घेण्यात आला.

कांदळगाव मध्ये भूमिगत वीज वाहिनी साठी रस्त्यांच्या कडेला लावलेले लाल रंगाचे काही बॉक्स मुसळधार पावसात कोसळले असून या कामात नित्कृष्टपणे काम केले जात असल्याचा आरोप सदस्या योजना कांबळी यांनी केला. सदर कोसळलेले बॉक्स सुस्थितीत लावले जातील असे यावेळी वीज अभियंता श्री. म्हेत्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वीज विभागात अनेक अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त असल्याने ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, असा ठराव सभेत घेण्यात आला.

यावेळी तालुक्यात विविध ठिकाणच्या एसटी बस फेऱ्या बंद असल्याबाबत तसेच बस फेऱ्यांच्या वेळेतील अनियमिततेबाबत एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मालवण आगारात सध्या ३० चालक, ३० वाहक व अन्य कर्मचारी मिळून सुमारे ७० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून मनुष्यबळ नसल्याने बस फेऱ्यांवर ताण येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बस फेऱ्या सुरळीत कराव्यात असे दीपक सुर्वे यांनी सांगितले तसेच पणजी गाडी सुरु करावी असे सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितले. तसेच एसटी प्रवाशांना देण्यात येणारे प्रवासी ओळखपत्र साठी गावागावात शिबीरे घ्यावीत असे बंडू चव्हाण यांनी सूचित केले.

यावेळी मसुरे – डांगमोडे रस्त्याचे काम गेले अनेक महिने रखडल्याबाबत सदस्य छोटू ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेतली. सदर रस्त्याचे काम अर्धवट असून त्यावर अनेक अपघात घडत आहेत, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास उपोषणास बसू, असा इशारा श्री. ठाकूर यांनी प्रशासनाला दिला. ज्या शाळेत नियुक्त केलेले शिक्षक अजूनही हजर झालेले नाही त्या शिक्षकांना नोटीस काढा, अशा सूचना सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दिल्या.

तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये १० अंगणवाडी सेविका व ९ मदतनीस पदे रिक्त असून मदतनीस यांच्या पदोन्नतीद्वारे अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडून देण्यात आली. कुंभारमाठ येथील म्हाडा वस्तीच्या परिसरात लोकसंख्या व मुलांची संख्या वाढली असून तेथे निकष पाहून अंगणवाडी सुरु करण्याची मागणी यावेळी मानसी भोगावकर यांनी केली. तर चिंदर येथे हवामान मापक यंत्र बसवावे, अशी मागणी दीपक सुर्वे यांनी केली.

error: Content is protected !!