आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार शहरात क्रीडा संकुलसाठी ४ कोटींचा निधी तर विविध विकासकामांसाठी १ कोटींचा निधी
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण शहराला दिवाळी गिफ्ट दिले आहे. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी एकूण ५ कोटींचा विकासनिधी राज्य नियोजन विभागातून मंजूर करण्यात आला आहे. यात मालवण वासियांची महत्वपूर्ण मागणी असलेल्या क्रीडा संकुलासाठी ४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीपूर्वी शहरवासियांना क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.या क्रीडा संकुलात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश असलेले ग्राउंड, सर्व इनडोअर-आउटडोअर क्रीडा प्रकार समाविष्ट असतील. या क्रीडासंकुला सोबतच मालवण शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून एकूण ५ कोटींचा निधी मालवण नगरपरिषदसाठी मंजूर झाला आहे. हा भरघोस विकासनिधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार व्यक्त केले आहेत.