अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा

सत्संग महिला भजनी मंडळाच्या पारंपारीक भजनाने जन्म सोहळा ; पाळणा कार्यक्रमामुळे वटवृक्ष मंदीरात स्वामी भक्तीला उधाण

पुरोहित मंदार महाराज – मोहित महाराज यांच्या मंत्रोच्चारात चेअरमन महेश इंगळे – प्रथमेश इंगळे यांच्याहस्ते पाळणा आरती संपन्न

अक्कलकोट : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तथा श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला.

पहाटे ४ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुरोहित मोहनराव महाराज व मंदार महाराज, व्यंकटेश महाराज यांच्या हस्ते मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत मोठ्या भक्तीभावात संपन्न झाली. यानंतर श्री. स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजीत प्रभात फेरी – नगर प्रदक्षिणेचा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते शुभारंभ करून स्वामीनामाचा जयघोष करीत मोठया भक्तीभावाने नगर प्रदक्षिणा मार्गस्थ झाली.

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून झालेल्या श्री स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांना स्वामींचे दर्शन सुलभतेने होणेकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थान विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले, त्यानंतर भजनगीत व आरती होऊन दुपारी १२ वाजता पुरोहित मंदार महाराज – मोहित महाराज यांच्या मंत्रोच्चारात मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे – प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळणा आरती होवून जन्म सोहळा व पाळणा इत्यादी पारंपारीक धार्मिक कार्यक्रमांनी स्वामींचा प्रकट दीन सोहळा मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला.

दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजनकक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले. दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी, सेवेकरी प्रयत्नशील होते. स्वामी भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिराच्या उत्तरे कडील बाहेरील परिसरातील नवसाच्या मारुती मंदिरापर्यंत रस्त्याच्या लगत कापडी मंडप दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, वयोवृद्ध व विकलांग भाविकांना विशेष दर्शन व्यवस्था, आपत्कालीन परिस्थीतीचा विचार करून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. नियोजनबद्ध स्वामी दर्शन व्यवस्थेमुळे सर्व स्वामी भक्तांनी तृप्त मनाने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय च्या जयघोषात श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन उत्सवाला भक्तीमय रंगत आणली.

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शरणमठाचे विश्वस्त बसवराज आलमद, प्रदीप हिंडोळे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, रामचंद्र समाणे, आदींसह असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!