खुशखबर | कोकणच्या जल वाहतुकीचे दालन १ मार्चला उघडणार : मुंबई विजयदुर्ग बोटसेवेचा होणार शुभारंभ

१ मार्चला सकाळी ८ वाजता मुंबईतून विजयदुर्गकडे प्रयाण ; मंत्री नितेश राणे यांनी बुकिंग केले पहिले तिकीट

मालवण ( कुणाल मांजरेकर) : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरु होत असलेल्या बहुचर्चित मुंबई विजयदुर्ग बोट सेवेचा येत्या १ मार्च पासून शुभारंभ होत आहे. सकाळी ८ वाजता मुंबई बंदरातून पहिली बोट निघणार असून दुपारी ३ वाजता विजयदुर्ग बंदरात पोहोचणार आहे. तर २ मार्चला दुपारी १२ वाजता ही बोट विजयदुर्ग बंदरातून निघून सायंकाळी ७ वाजता मुंबईत पोहोचणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग मार्गावर मंत्री नितेश राणे यांनी पहिल्या तिकिटाचे बुकिंग केले आहे. 

मार्च महिन्यात मुंबई ते विजयदुर्ग आणि विजयदुर्ग ते मुंबई मार्गावर या बोटीच्या १६ फेऱ्या चालणार आहेत. २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता ही बोट विजयदुर्ग बंदरातून निघून संध्याकाळी ७ वाजता मुंबईत पोहोचणार आहे. ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च रोजी मुंबईतून तर ५, ८, १२, १५, १९, २२ व २६ मार्च रोजी ही बोट विजयदुर्ग ते मुंबई च्या मार्गावर धावणार आहे.

मंत्री नितेश राणे यांच्यामुळे कोकणवासियांचे स्वप्न प्रत्यक्षात

मुंबई ते कोकण यापूर्वी जलवाहतुकीचे मुख्य केंद्र होते. कोकणच्या बाजारपेठेतील साहित्य समुद्र मार्गे मुंबईत जात होते. मात्र काही वर्षांपूर्वी एका अपघातामुळे ही बोट सेवा बंद झाली. ही जल वाहतूक पूर्ववत सुरु करण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. पण त्याला मूर्त रूप येत नव्हते. अखेर कोकण वासियांचे हे स्वप्न साकार केले आहे ते कोकणचे युवा नेते मंत्री नितेश राणे यांनी ! बंदर विकास मंत्रालय हाती आल्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्ग बोट सेवा सुरु करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरु केला. त्यातील सर्व अडथळे दूर केले. त्याचीच परिणीती म्हणून १ मार्च पासून मुंबई ते विजयदुर्ग बोट सेवा सुरु होत आहे. त्यामुळे कोकणच्या जल वाहतुकी बरोबरच सागरी पर्यटनाचे दालन नव्याने उघडणार आहे

error: Content is protected !!