
मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्याकडून तातडीने १५ सिमेंट पत्रे, ताडपत्रीची मदत

मालवण : तारकर्ली येथील रहिवासी श्रीमती वैशाली मुंबरकर यांच्या राहत्या घराचे छताचे पत्रे उडून गेल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. ऐन पावसाळ्यात कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबाला अवघ्या काही तासांतच मोठा दिलासा मिळाला आहे.
वैशाली मुंबरकर यांच्या घराचे पत्रे उडाल्याची बाब स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रीग्ज यांना फोनद्वारे या घटनेची कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पास्कोल रॉड्रीग्ज यांनी लगेचच आपले सहकारी मित्र आणि मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्याशी संपर्क साधला व त्यांना मदतीसाठी आवाहन केले.
पास्कोल रॉड्रीग्ज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गॅरी अन्ननसिएशन यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता थेट मुंबरकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. नुकसानीची पाहणी करून त्यांनी पीडित महिलेला तात्पुरता निवारा उभारण्यासाठी १५ नवीन सिमेंट पत्रे आणि एक मोठी ताडपत्री स्वखर्चातून सुपूर्द केली. यामुळे मुंबरकर कुटुंबाचे घर पुन्हा सुरक्षित होण्यास मदत झाली आहे.संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून माणसाच्या पाठीशी उभे राहणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. मुंबरकर कुटुंबाला या संकट काळात छोटीशी मदत करता आली याचे समाधान आहे असे गॅरी अन्ननसिएशन यांनी सांगितले. ऐन गरजेच्या वेळी धावून जात दाखवलेल्या या उदात्त आणि सामाजिक वृत्तीबद्दल गॅरी अन्ननसिएशन आणि त्यांना तात्काळ संपर्क करणारे पास्कोल रॉड्रीग्ज यांचे तारकर्ली ग्रामस्थांकडून विशेष आभार मानले जात आहेत.





Subscribe to my channel






