एकाच मंचावर दोन नारळ लढती; लाखोंच्या बक्षिसांसाठी रंगणार महासंग्राम!

सतीश आचरेकर मित्रमंडळ आणि रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ यांचे मालवण बंदर जेटीवर भव्य दिव्य आयोजन

मालवण : नारळी पौर्णिमेचा उत्साह यंदा मालवण बंदर जेटीवर अक्षरशः शिगेला पोहोचणार आहे. पारंपरिक नारळ लढविण्याच्या खेळाला लाखोंच्या पारितोषिकांची जोड मिळाली असून, गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता बंदर जेटीवर दोन भव्य स्पर्धांचा महासंगम रंगणार आहे. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धांमुळे मालवणकरांसह पर्यटकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धा आणि रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित व सतीश आचरेकर पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा अशा दोन स्पर्धांमध्ये नारळांच्या लढतीचा थरार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बंदर जेटीवर नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला स्पर्धेची रंगत आणि जल्लोषाची किनार लाभणार आहे.

पहिल्या स्पर्धेत लाखाचे पहिले बक्षीस!

सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला तब्बल १ लाख १ हजार १११ रुपये रोख आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार १११ रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये रोख पारितोषिकासह आकर्षक चषक देऊन विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे.

दुसऱ्या स्पर्धेतही दमदार बक्षिसे

रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित व सतीश आचरेकर पुरस्कृत स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी २ हजार २०० रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

परंपरेचा थरार, मालवणी उत्साहाचा जल्लोष!

नारळ लढविणे हा मालवणच्या मातीत रुजलेला पारंपरिक खेळ असून, नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने या खेळाला विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदा एकाच दिवशी दोन स्पर्धा होत असल्याने बंदर जेटीवर नारळांच्या लढतीसोबत जल्लोष, उत्साह आणि प्रेक्षकांच्या दादेने वातावरण भारून जाण्याची शक्यता आहे. मालवणची पारंपरिक संस्कृती आणि नारळी पौर्णिमेचा उत्साह अनुभवण्यासाठी नागरिकांनी तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नारळ लढतींच्या महासंग्रामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!