अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सोहळा
अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात सौम्या प्रोडक्शन प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट कॅलक्युलेटर याचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँच सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते कॅलक्युलेटर चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँच करण्यात आले.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, अंकुश मांडेकर, चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शुभम दळवी आणि निर्माते पल्लवी अगरवाल यांच्यासह मनिष शिंदे, सायली शिंदे, के.विजय, आदित्य पवार, स्नेहल करंडे, श्रावणी जाधव आणि अरुण पाणीभाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्क्रिप्टपूजन आणि पोस्टर लाँचनंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. “कॅलक्युलेटर” हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि मनोरंजक अनुभव ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले व सहकारी यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्र देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक अविनाश मडीखांबे,मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव इत्यादी उपस्थित होते.