
पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत पक्षप्रवेश; पुरळमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार
कणकवली : पुरळ परिसरात उबाठा सेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री संतोष तावडे यांच्यासह संतोष वसंत तावडे आणि रुचिता रूपेश पुरळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तिघांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पालकमंत्री राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करत आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
अनुश्री तावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरळमधील उबाठा सेनेच्या राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरल्याने आगामी काळात पुरळ परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.यावेळी पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, भाजप जिल्हा सचिव संदीप साटम, ओबीसी मंडल अध्यक्ष भूषण पोकळे, जिल्हा परिषद गटनेते संजय बोबडी, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल, वाडा सरपंच सुनील जाधव, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, गौरव बोबडी, मंडल प्रभारी डॉ. अमोल तेली, अमित साटम, मिलिंद साटम, फरीद काझी आदी उपस्थित होते.
दरम्यान, तावडे यांच्या प्रवेशामुळे पुरळमधील उबाठा सेनेची सत्ता संपुष्टात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. आगामी काळात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुरळ परिसराच्या विकासासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात भाजपला बळ मिळाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुरळमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.







Subscribe to my channel






