“बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाचे मालवणात २० ऑक्टोबरला शक्तीप्रदर्शन

ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकर यांची उपस्थिती ; मेळाव्याच्या अनुषंगाने उद्योजक किरण सामंत यांचा आढावा दौरा

तूर्तास निवडणूक लढवण्याचा विचार नाही ; पण पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पार पाडू : किरण सामंत

मालवण (कुणाल मांजरेकर) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने २० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मालवण शहरातील आर. जे. चव्हाण मंगल कार्यालयात तालुक्याचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार सुधीर सावंत उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात अनेकांचे पक्ष प्रवेश होणार असून या मेळाव्याच्या निमित्ताने भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिंदे गटाचे नेते, उद्योजक किरण सामंत यांनी शनिवारी आचरा, मालवण आणि देवबागचा दौरा केला. यावेळी शहरातील रामेश्वर हॉटेल मध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय आग्रे, बबन शिंदे, संदेश पटेल, भास्कर राणे, महेश राणे, राजा गावकर, विश्वास गावकर, विलास साळसकर, किसन मांजरेकर, राजा तोंडवळकर, पराग खोत, भूषण परुळेकर, नीलम शिंदे, डॉ. राऊळ, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

विकासात्मक प्रश्न समन्व्याने सोडवणार

आपल्या पहिल्याच मालवण दौऱ्यात जनते कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, महिला आपले विविध प्रश्न घेऊन येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार वरील विश्वास दिसून येत आहे. जनतेने मांडलेले प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सोडवले जातील, असे किरण सामंत म्हणाले.

यावेळी किरण सामंत म्हणाले, मालवण येथे २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पक्षाच्या तालुकास्तरीय मेळाव्याच्या नियोजनासाठी आजचा आढावा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वााखाली शिवसेना आणि भाजपा युती सरकार मार्फत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न योग्यरित्या हाताळले जात आहेत. आता कार्यकर्ते आणि जनतेचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक जण अजूनही पक्षात येण्यास इच्छूक आहेत. या सर्वांना सामावून घेत लवकरच तालुका कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे.

लोकसभा मतदार संघाबाबतचा निर्णय मागाहून होणार

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिंदे गट ( बाळासाहेेबांची शिवसेना) कडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत विचारले असता अद्याप ही जागा भाजपा लढवणार की शिंदे गट याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे योग्य तो निर्णय घेतील. तूर्तास पक्ष संघटना वाढवणे हाच एकमेव उद्देश घेऊन आपली वाटचाल सुरु आहे, असे भैय्या सामंत म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!