सागरी महामार्गावरील आठवडा बाजारामुळे वाहतुकीस अडथळा…

आठवडा बाजार पूर्ववत सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत न्या : मनसेने प्रशासनाचे वेधले लक्ष

मालवण : कोरोना काळात तात्पुरत्या कालावधीसाठी सागरी महामार्गावर नेण्यात आलेला आठवडा बाजार गेली पाच वर्षे त्याचठिकाणी कायम आहे. या आठवडा बाजारामुळे दर सोमवारी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा रुग्णवाहिकेला देखील येथून वाट काढताना कसरत करावी लागते. तरी सागरी महामार्गावर भरणारा आठवडा पूर्ववत सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत न्यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. हे निवेदन मालवण तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहे, अशी माहिती मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२० मध्ये कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून मालवण बाजारपेठेत भरणारा आठवडी बाजार हा तात्पुरत्या स्वरूपात सागरी महामार्ग देऊळवाडा येथे भरवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने घेण्यात आला. लॉकडाऊन बंदी कालावधी संपल्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी म्हणजेच सोमवार पेठ येथे आठवडी बाजार सुरू करणे गरजेचे होते. परंतु अद्यापही आठवडी बाजार सागरी महामार्गाच्या भर रस्त्यावर भरवला जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा मन:स्ताप हा वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रस्त्याकडेला बसलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करताना बाजूने वाहने जात असताना छोटे मोठे अपघात घडण्याचे प्रकार होत असतात. याचा मन:स्ताप वाहनचालक आणि नागरिकांना सहन कराव लागतो. शहरांत येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता ही अतिशय गंभीर बाब आहे. तरी वाहतूक कोंडी हा मुद्दा लक्षात घेता सागरी महामार्ग या ठिकाणी भरणारा आठवडी बाजार तात्काळ बंद करून पूर्ववत म्हणजेच सोमवार पेठ मालवण आणि समुद्रकिनारी सुरू करण्यात यावा. जेणेकरून वाहनधारक आणि स्थानिक नागरिक याना या त्रासापासून सुटका मिळेल. आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. तसेच यामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण निश्चितच कमी होईल. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!