पंतप्रधान मोदींकडून राणेंच्या पाठीवर कौतुकाची थाप !
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना नरेंद्र मोदींकडून नारायण राणेंचे कौतुक
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : राज्याचे डॅशिंग नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांकडून आज ठिकठिकाणी उत्साहात साजरा होतोय. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून या शुभेच्छा देतानाच राणेंच्या कामाचे मोदींकडून तोंड भरून कौतुक करण्यात आले आहे. वाढदिनी पंतप्रधान मोदींची शाबासकी ही राणेंच्या भावी वाटचालीसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्रातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. राज्याच्या राजकारणात महसूलमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उद्योग मंत्री यांसारख्या विविध पदांवर काम केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपाने राज्यसभेची खासदारकी त्यांना बहाल केली. अलीकडेच आठ महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंची वर्णी लावून त्यांच्यावर भाजपने मोठा विश्वास दाखवला आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री पद राणेंकडे सोपवण्यात आले आहे. या खात्याच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासासाठी नारायण राणे देत असलेल्या योगदानाची स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. आज नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा होत असून पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून राणे यांना शुभेच्छा देताना त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. आपल्या ट्विटर मध्ये मोदींनी म्हटले आहे की, “केंद्रीय मंत्री श्री नारायण राणेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी महत्त्वाच्या MSME क्षेत्राला अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांमध्ये ते आघाडीवर आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो.” वाढदिनी स्वतः मोदींनी केलेले कौतुक राणेंच्या दिल्लीतील वर्चस्वाची पोचपावती देणारे मानले जात आहे.