रक्षाबंधनाला पोलिसांची ‘सुरक्षा राखी’; हेल्मेट-सीटबेल्टसाठी मालवणात अनोखी मोहीम

‘राखी’च्या धाग्यातून सुरक्षित प्रवासाचा संदेश; उद्यापासून नियमभंग करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई

मालवण : रक्षाबंधन म्हणजे नात्यांच्या संरक्षणाचा सण… याच भावनेला रस्ते सुरक्षेची जोड देत सिंधुदुर्ग पोलीस दलाने मालवणात ‘सुरक्षा राखी’ हा अभिनव उपक्रम राबविला. हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याचा संदेश देत पोलिसांनी वाहनचालकांच्या मनात सुरक्षिततेची जाणीव निर्माण केली. रक्षाबंधनाच्या दिवशी पोलिसांनी बांधलेली ही ‘सुरक्षा राखी’ वाहनचालकांसाठी सुरक्षित प्रवासाची जणू आठवणच ठरली.

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने मालवण शहरातील देऊळवाडा नाका येथे हे जनजागृती अभियान राबविण्यात आले.

हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी तसेच लोकप्रतिनिधींनी ‘सुरक्षा राखी’ बांधत हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. केवळ कारवाईचा धाक न दाखवता रक्षाबंधनाच्या भावनिक नात्याचा आधार घेत सुरक्षिततेचा संदेश देण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरला. दुचाकी चालविणाऱ्या महिलांनाही गुलाबपुष्प देऊन हेल्मेट वापराबाबत आपुलकीने जनजागृती करण्यात आली.

नगरसेविका नीना मुंबरकर यांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत वाहनचालकांना सुरक्षा राखी बांधली. वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत, याची जाणीव त्यांनी वाहनचालकांना करून दिली.

‘हेल्मेट-सीटबेल्ट’कडे दुर्लक्ष महागात पडणार!

दरम्यान, जनजागृतीसोबतच पोलिस प्रशासनाने आता नियमभंग करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. उद्यापासून मालवण शहरात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट, तर चारचाकी वाहनचालकांसाठी सीटबेल्टचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘सुरक्षा राखी’च्या माध्यमातून पोलिसांनी एक महत्त्वाचा संदेश दिला, रस्त्यावरचा प्रत्येक प्रवास सुरक्षित असणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर प्रत्येक वाहनचालकाचीही बांधिलकी आहे. त्यामुळे हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक पंडीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जितेंद्र पेडणेकर, सुरज रेडकर, सुप्रिया पवार, रंजू डोये, संकेत तांडेल, राजाराम तेरेखोलकर, शशिशेखर प्रभू, आरती खोबरेकर, सोनाली पाटकर, भक्ती शिवलकर, ज्योस्त्ना पोखरे, दीपक गावडे, धनंजय निवतकर, गणेश माने तसेच जिल्हा वाहतूक पोलीस कर्मचारी महेंद्र देऊलकर, मंचकराव शिरडे, नागेश मालवे आदी अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राखीचा धागा नात्यांचे संरक्षण करतो; ‘सुरक्षा राखी’चा धागा मात्र रस्त्यावर जीव वाचविण्याचा संदेश देऊन गेला.

error: Content is protected !!