माझ्या घरात सापडलेल्या पैशाचा स्रोत पूर्णपणे कायदेशीर : विजय केनवडेकर 

आ. निलेश राणेंनी घरात अनधिकृत प्रवेश करत दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप

कालच्या घटनेमुळे कुटुंब दहशतखाली ; घरात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार ; भाजप सोडणार नाही, दबावाला भीक घालणार नाही…

मालवण : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या कृतीनंतर निर्माण झालेल्या वादावर आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. काल सायंकाळी आपल्या निवासस्थानी आमदार राणे यांनी अनधिकृत प्रवेश केल्याचा आणि दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप करत हा सर्व प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच घरात सापडलेल्या पैशांचा स्रोत पूर्णपणे कायदेशीर असून आपण भाजपशी एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केनवडेकर यांनी स्पष्ट केले की, ही पत्रकार परिषद केनवडेकर परिवाराच्या वतीने घेण्यात आली असून यात भाजपचा कोणताही संबंध नाही. ते म्हणाले की, काल सायंकाळी त्यांच्या वयोवृद्ध आई, वहिनी आणि पुतण्या घरात असताना आमदार निलेश राणे यांनी थेट शूटिंग करत घरात प्रवेश केला. माझ्या निवासस्थानात त्यांनी अनधिकृत प्रवेश केला आणि ते माझ्या बेडरूममध्येही गेले. हा प्रकार निंदनीय असून माझे कुटुंबीय दहशतीखाली आहेत. माझ्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत प्रवेश करत दहशतीचे वातावरण निर्माण केले. घरात सापडलेल्या पैशांविषयी त्यांनी खुलासा केला की, हा पैसा त्यांच्या ‘केके बिल्डर’ या व्यवसायातील आहे. पत्नी वेदिका केनवडेकर या व्यवसायात असून मालवण येथील फोवकांडा पिंपळ येथे त्यांच्या टॉवरचे काम सुरू आहे. रेरा रजिस्ट्रेशन, फर्म रजिस्ट्रेशन, आणि जीएसटी क्रमांक घेतला आहे. दररोज माझ्याकडे येणारा कारपेंटर असेल, सेंट्रिंग वाला असेल, याला मला चेकने पैसे देता येत नाहीत आणि मला जे पैसे दिले ते माझ्या नातेवाईकांनी आणि मित्रांनीच दिलेले आहेत. पैसे माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत आणि मी १०० टक्के ते सादर करणार आहे. हे माझ्या के के कन्ट्रक्शनचे पैसे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

जप्त करण्यात आलेले पैसे ट्रेझरीमध्ये ठेवण्यात आले असून याबाबतचे पत्र पोलीस प्रशासनामार्फत मिळाले आहे. कोणीही उत्तर मागितलेले नाही, मात्र जेव्हा मागितले जाईल, तेव्हा कायदेशीर सल्लागार घेऊन योग्य ते उत्तर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. माझ्यावर किती दबाव आणा आणि कितीही करा, यात माझं बरं-वाईट झालं तरी मला काही नाही. मी भाजपला समर्पित म्हणूनच राहून काम करणार. मी पक्ष बदलू आणि स्वार्थी नाही. मला खूप प्रलोभने आली, पण मी कधी स्वार्थ ठेवून भारतीय जनता पार्टी सोडली नाही.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत ३० वर्षे एकनिष्ठेने काम केल्याचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बचत गटांचे जाळे उभे करण्यात आपला मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. त्यांच्या सामाजिक कारकिर्दीत आजवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दत्ता सामंत आणि वैभव नाईक यांनी जर आपण कोणाला पैसे दिले हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविले, तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.माझ्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी अनधिकृत रित्या प्रवेश घेतला आहे, त्यामुळे या विरोधात कायदेशीर कारवाई करायला लावणार आहे. माझे बलिदान जाईल. माझ्या कुटुंबाच्या ७५ वर्षाच्या तपश्चर्येला तडा लावलेला आहे.

यापूर्वी नारायण राणे यांनी आपल्याला कोकण रेल्वे आणि एमएसईबीच्या राष्ट्रीय बोर्डावर संधी दिली. राणे यांच्या आशीर्वादाने आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७८ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. राणे आणि निलेश राणे यांचाही आपल्यावर विश्वास होता, असे त्यांनी नमूद केले. काही गोष्टी खटकल्या तेव्हा निलेश राणे यांचे यात लक्ष वेधले, तेव्हा त्यांना मोठ्या भावाप्रमाणे आपण काम करू असं सांगणारे निलेश राणे मी बघितले. पण हे अशा प्रकारचं राजकारण करून माझ्या परिवाराचं खच्चीकरण करत आमच्या तपश्चर्येवर घाला घातला गेला आहे. मात्र असे झाले तरी मरेपर्यंत भाजप सोडणार नाहीत आणि कमळ लावूनच फिरणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!