मिठमुंबरीच्या फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकेल : पालकमंत्री नितेश राणे

देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठे व्यासपीठ ; ‘Say No to Drugs’चा संदेश देत आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन

४.७४० किलोच्या वाघळी माशासाठी समीर लाड प्रथम; मंदार रेगे द्वितीय तर नयन सुतार तृतीय

देवगड : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बीचवर देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर पोहोचण्यास निश्चितच मोठी मदत होईल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. पारंपरिक कार्यक्रमांसोबतच साहसी, नाविन्यपूर्ण आणि क्रीडा पर्यटनाला चालना देणारे उपक्रम सातत्याने आयोजित झाले, तर देवगड पर्यटक आणि क्रीडारसिकांचे आकर्षणाचे केंद्र बनेल, असे त्यांनी सांगितले.

देवगडमध्ये काहीतरी नवीन घडत असल्याचे पाहून आपल्याला सर्वाधिक आनंद होतो. देवगडला लोकांनी यावे, देवगडचे नाव घ्यावे आणि देवगडचे नाव मोठे व्हावे, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने झाले पाहिजेत, अशी अपेक्षा आपण पहिल्या दिवसापासून व्यक्त करत आलो आहोत, असे नितेश राणे म्हणाले.

पर्यटनाच्या नकाशावर देवगडला ठळकपणे आणायचे असेल, तर पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच फिशिंग टूर्नामेंटसारख्या वेगळ्या आणि साहसी उपक्रमांची गरज आहे. सिंधुदुर्गातील मिठमुंबरी बीचवर फिशिंग टूर्नामेंट होत असल्याची चर्चा राज्यभर होणे, हे देवगडच्या भविष्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

पहिल्याच कार्यक्रमात ‘पहिल्याच बॉलवर सिक्सर’!

ललित चांदोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगड स्पोर्ट्स क्लबची स्थापना करून तरुणाईला क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ देण्याचा तसेच देवगडची ‘आरोग्यदायी तालुका’ अशी ओळख निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. पहिल्याच कार्यक्रमात ‘पहिल्याच बॉलवर सिक्सर’ मारल्याप्रमाणे देवगड स्पोर्ट्स क्लबने आपल्या कार्याची ताकद दाखवून दिली आहे, अशा शब्दांत नितेश राणे यांनी क्लबचे कौतुक केले.आता यापेक्षाही मोठे आणि दर्जेदार कार्यक्रम देवगडमध्ये आयोजित करावेत. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स तसेच मच्छीमार समाज आणि स्थानिक तरुणांना मोठे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करावे. देवगडच्या तरुणांनी एकत्र येऊन देवगडचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचवावे; यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Say No to Drugs’चा संदेश; तरुणांनी क्रीडेकडे वळावे‘

Say No to Drugs’चा संदेश देत तरुणांनी व्यसनांच्या मार्गापासून दूर राहून क्रीडा क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून तरुणांनी स्वतःला स्पोर्ट्समन म्हणून घडवावे. देवगड पोलीस आणि प्रशासनासोबतच समाजानेही या प्रयत्नांना बळ दिले, तर देवगड आणि सिंधुदुर्गचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धेसाठी विविध राज्यांतून आलेल्या एँग्लर्सचे स्वागत करून नितेश राणे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून देवगड स्पोर्ट्स क्लबने जिल्ह्यात आणि राज्यात एक सकारात्मक व अभिनव संदेश दिला असून, माध्यमांच्या माध्यमातून हा उपक्रम राज्यभर पोहोचल्यास देवगडच्या या प्रयोगाचा निश्चितच अभिमान वाटेल, असे त्यांनी सांगितले.

४.७४० किलोच्या वाघळी माशासाठी समीर लाड प्रथमफिशिंग टूर्नामेंटमध्ये ४.७४० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी समीर लाड यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ३.३०० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी मंदार रेगे यांनी द्वितीय, तर २.३८० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी नयन सुतार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

स्पर्धेतील पहिली पकड ललित परब (अनुक्रमांक २१) यांनी सकाळी ८.२६ वाजता केली, तर शेवटची पकड तोडणकर (अनुक्रमांक २९) यांनी दुपारी १.५५ वाजता केली. सर्वाधिक चार पकडी करण्याचा विक्रम अनंत सावंत (अनुक्रमांक २) यांनी नोंदवला.विशेष म्हणजे स्पर्धेत पकडलेले सर्व मासे ‘कॅच अँड रिलीज’ पद्धतीने पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. समुद्री जीवसृष्टीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे भान राखत स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले.

कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, अर्बन बँक देवगडचे अध्यक्ष प्रकाश राणे, बाळा खडपे, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, योगेश चांदोसकर, देवगड-जामसंडे नगरपंचायत सभापती तन्वी चांदोस्कर, बुवा तारी, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर, देवगड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष ललित चांदोरकर, किरण पाटील, सोहम पारकर आणि चिन्मय खानविलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.

error: Content is protected !!