भाजप नगरसेवकांनी स्वच्छता निरीक्षकांना दाखविले कचऱ्याचे ढिगारे

कुडाळ शहरातील गोंधडवाडी येथील पुलाखाली कच-याचे ढिग

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील गोंधडवाडी येथील सोनवडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलांच्या खाली मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचा ढिगारा निर्माण झाला आहे. कचर्‍याचा ढिगारा नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर यांना भाजपच्या नगरसेवकांनी दाखवून या ठिकाणी कचरा टाकणा-यांवर कारवाई करा अशी मागणी केली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कुडाळ नगरपंचायतीची स्वच्छ सर्वेक्षणसाठी तपासणी करण्यात आली. मात्र या समितीला ठराविक ठिकाणी फिरविण्यात आले.

दोन दिवसांपूर्वीच कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छ सर्वेक्षण तपासणीसाठी समिती शहरांमध्ये आली होती आणि या समितीने शहरातील नागरिकांची मते सुद्धा विचारात घेतली होती. मात्र शहरामधील नगराध्यक्ष आफ्रीन करोल आणि बांधकाम सभापती श्रेया गवंडे यांच्या प्रभागात असलेल्या गोंधडवाडी येथील सोनवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचा ढिगारा साचलेला आहे. तसेच या पुलाखालून जवळच गणेश घाट आहे. हा कचरा गणेश घाटापर्यंत वाहून जातो. त्यामुळे तो व्हाळ ही अस्वच्छ होत आहे. दरम्यान, कुडाळ नगरपंचायतीचे भाजपचे गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक निलेश परब, ऍड. राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगरसेवक गणेश भोगटे, राजेश पडते यांनी या कचऱ्याची पाहणी करून स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर यांना त्याठिकाणी बोलावून ही परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे या ठिकाणचा कचरा स्वच्छ करून कचरा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा तसेच बॅनर लावा अशी मागणी केली. याबाबत स्वच्छता निरीक्षक कोरगावकर यांनी लवकरात लवकर बॅनर लावून या ठिकाणी कचरा टाकणा-यांवर लक्ष ठेवला जाईल आणि कारवाई केली जाईल असे सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!