निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला धक्का ; धनुष्यबाण चिन्ह गोठवलं !

शिवसेना” नावही वापरता येणार नाही ; अंधेरी पोटनिवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवावी लागणार

मुंबई : खरी शिवसेना कोणाची, यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात न्यायालयीन लढाई सुरु असताना निवडणूक आयोगाने शनिवारी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेची ओळख असलेली धनुष्यबाण निशाणी गोठवण्यात आली असून शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. यांमुळे अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला वेगळ्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात निवडणुक आयोगाची बैठक झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाची ही बैठक तब्बल चार तासानंतर संपली. शिवसेनेला पुरावा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिवसेनेने कागदपत्रांचा 700 पानांचा गठ्ठा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्हावर त्वरित सुनावणी घेऊ नये अशी शिवसेनेची मागणी होती. एकनाथ शिंदे अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाहीत, त्यामुळे सर्व कागदपत्र सादर होईपर्यंत सुनावणी घेऊ असं शिवसेनेचे म्हणणे होते. केवळ भाजपला फायदा होण्यासाठी शिंदेंची त्वरित सुनावणीची मागणी असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे. तर, अंधेरी विधानसभेची जागा भाजप लढवणार आहे. आता निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. आता वेगळ्या चिन्हावर शिवसेनेला या निवडणुकीत उतरावे लागणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!