दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेली धोकादायक वीज वाहिनी सुस्थितीत करणार

महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांची ग्वाही ; स्थानिक नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांनी वेधले लक्ष

मालवण : शहरातील दांडी किनाऱ्यावर दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेल्या धोकादायक विजवाहिनीबाबत स्थानिक व्यवसायिक, पर्यटक आणि मच्छिमारानी स्थानिक नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे लक्ष वेधल्यानंतर मालवण वीज वितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांच्या सोबत त्यांनी दांडी किनाऱ्यावर पाहणी केली. या पाहणी दरम्यान श्री. मेहेत्रे यांनी धोकादायक असलेली ही वीज वाहिनी आठ ते दहा दिवसात सुरक्षित पद्धतीने उंचीवर नेण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.

मालवण दांडी किनाऱ्यावरील दांडेश्वर मंदिर ते पद्मगड वीजवाहिन्या द्वारे वीज पुरवठा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. अलीकडच्या काळात ही विजवाहिनी खाली आल्याने ही विजवाहिनी मच्छिमारासह पर्यटकांच्या जीवितास धोकादायक बनली आहे याबाबत स्थानिक व्यवसायिकानी महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे लक्ष वेधल्यावर वीज वितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांच्या सोबत दांडी किनाऱ्यावर पाहणी केली. आगामी काळात दांडी किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु होणार असून लवकरात लवकर सदर वीज वाहिनी उंचीवर नेऊन सुस्थितीत ठेवावी अशी मागणी यावेळी सौ. आचरेकर यांनी वीज अभियंता श्री. मेहेत्रे यांच्याकडे केली. या वीज वाहिनीच्या खांबांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम चालू असून पुढील दहा दिवसांत ही वीजवाहिनी सुरक्षित उंचीवर नेण्यात येईल, असे आश्वासन संबंधीत कॉन्ट्रॅक्टर यांनी दिले असल्याचे यावेळी श्री. मेहेत्रे यांनी सांगितले.

error: Content is protected !!