
वैभववाडी तालुक्याचा १०० टक्के कर्जवसुलीचा आदर्श; २२ विकास सेवा संस्थांचा जिल्हा बँकेकडून गौरव
वैभववाडी : जिल्हा बँकेसह सहकार विभागातील सर्व यंत्रणा विकास सेवा संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बदलत्या काळानुसार विकास संस्थांचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकारातून देशभरातील विकास संस्थांचे आर्थिक व्यवहार संगणकीकृत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
वैभववाडी पंचायत समिती सभागृहात शनिवारी १०० टक्के कर्जवसुली करणाऱ्या २२ विकास सेवा सहकारी संस्थांचा सत्कार सोहळा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते. दळवी म्हणाले, गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील सर्व विकास संस्थांना संगणक व आवश्यक सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संस्थांच्या सचिवांनी घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्ह्यात १०० टक्के संगणकीकरण पूर्ण झाले आहे. आता जमा-खर्च, कर्जवाटप आणि कर्जवसुलीच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद रोजच्या रोज ‘डायनॅमिक डे’ पद्धतीने होत आहे. त्यामुळे संस्थेचे व्यवहार त्याच क्षणी जिल्हा बँक, सहकार विभाग, नाबार्ड तसेच राज्य व केंद्र शासनाच्या यंत्रणांना उपलब्ध होत आहेत. परिणामी व्यवहारात सुसूत्रता व पारदर्शकता वाढली असून सभासदांचा संस्थांवरील विश्वासही अधिक दृढ झाला आहे.
सभासदांना अधिक गतिमान सेवा देण्यासाठी राज्य शासनाने सुमारे २० वर्षांनंतर सहकार कायद्यात बदल करून ‘मान्यताप्राप्त सचिव’ ही संकल्पना आणली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ७२ मान्यताप्राप्त सचिवांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या असून उर्वरित ७३ सचिवांच्या नियुक्त्या अंतिम टप्प्यात असल्याचे दळवी यांनी सांगितले.

‘कर्जमाफीपेक्षा नियमित कर्जफेडीला प्रोत्साहन द्या’
वैभववाडी तालुक्याच्या नियमित कर्जफेडीच्या कामगिरीचे विशेष कौतुक करताना दळवी म्हणाले, “पूर्वी कुडाळ तालुका नियमित कर्जफेडीसाठी ओळखला जायचा; आता वैभववाडीने तो आदर्शही मागे टाकला आहे. १०० टक्के कर्जाची परतफेड कुठे होत असेल तर ती वैभववाडी तालुक्यात होत आहे.”कर्जमाफीपेक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून, सध्या दिल्या जाणाऱ्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनाऐवजी एक लाख रुपयांचे प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. ज्या पद्धतीने १०० टक्के वसुली करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो, त्याचप्रमाणे प्रत्येक गावात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान झाला पाहिजे, असेही दळवी यांनी स्पष्ट केले.
२२ संस्थांचा गौरव
१०० टक्के कर्जवसुली केल्याबद्दल दिर्बादेवी तिथवली, केदारलिंग करूळ, अचिर्णे, आदिष्टी खांबाळे, केदारलिंग हेत, गांगेश्वर भुईबावडा, महालक्ष्मी कोकिसरे, शिवाजी तिरवडे, शंकर प्रासादिक नाधवडे, ग्रामसेवा सोनाळी, श्रीराम नावळे, कुंभजाई कुंभवडे, सिद्ध गांगेश्वर उपळे, गांगेश्वर गडमठ, रवळनाथ एडगाव, छत्रपती शिवाजी अरुळे, ओम आखवणे, ठाणेश्वर नापणे, गांगो लोरे, एकविरा नानिवडे, प्रकाश कुर्ली आणि रवळनाथ सडूरे या २२ विकास सेवा सहकारी संस्थांचा जिल्हा बँकेच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगावकर, दिलीप रावराणे, माजी संचालक दिगंबर पाटील, चेअरमन सौ. सीमा नानीवडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, संगणक प्रमुख हडकर, तालुका विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर आणि शाखा व्यवस्थापक सुरेश रावराणे यांच्यासह विकास संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






Subscribe to my channel






