सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची ग्वाही ; नांदोस गढीच्या जतन, संवर्धनाचे सर्व श्रेय पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनाच…


मालवण : जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य अंधकारमय असते. म्हणूनच पंतप्रधानांनी विरासत से विकास असा नारा दिला आहे. आम्हाला इतिहास पण पहायचा आहे आणि विकास पण पहायचा असल्याने भकास करणारा विकास न करता समृद्ध करणारा विकास हवा आहे. या भागात समृद्धता येण्यासाठी इतिहास मजबुतीने मांडला गेला पाहिजे. नांदोस गढीचा इतिहास समोर आल्यावर देशाच्या नकाशावर नांदोसचे नाव ठळकपणे येण्यासाठी नांदोस गावच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी येथे बोलताना दिली.
मालवण तालुक्यातील नांदोस येथील शिवकालीन गढी पुरातत्वीय उत्खननाचा शुभारंभ राज्याचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते आणि मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, माजी जि. प. सदस्य अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, कट्टा गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, माजी जि. प. सदस्य बाळा महाभोज, माजी उपसभापती राजू परुळेकर, सरपंच माधुरी चव्हाण, उपसरपंच विजय निकम, मंदार केणी, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, शेखर मसुरकर, सुमित सावंत, सतीश वाईरकर,पुरातत्व विभाग डॉ. तेजस गर्गे, श्री वहाणे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सरपंच माधुरी चव्हाण, आणि उपसरपंच विजय निकम यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर पुरातत्व विभागाचे अधिकारी डॉ. तेजस गर्गे यांनी प्रास्ताविक केले आपल्या भाषणात मंत्री ना. आशिष शेलार म्हणाले, नांदोस व मालवण तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इथल्या भूमीत जो इतिहास दडला आहे तो जाणून घेणे आवश्यक आहे. आज महायुती सरकारच्या माध्यमातून मुंबईत भूमिगत मेट्रो मार्ग, भूमिगत रस्ते, पाईप लाईन, गटार व्यवस्था अशा अनेक भूमिगत सुविधा उपलब्ध करून मुंबईच्या जमिनीखाली दुसरी एक नवीन मुंबई वसवली जात आहे. असे असताना दुसरीकडे ग्रामीण भागात भूगर्भात दडलेली विरासत, इतिहास शोधण्यासाठी उत्खनन केले जात आहे.असे सांगून ते म्हणाले, नांदोस गढीच्या जतन संवर्धन व उत्खननासाठीचे सर्व श्रेय पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनाच जाते. नांदोस गढीच्या संवर्धन कार्यात नांदोस ग्रामस्थांचा आशीर्वाद आवश्यक आहे. कारण इतकी वर्षे नांदोस ग्रामस्थांनीच स्व:मेहनतीने, स्व:कष्टातून गढीचे संवर्धन केले आहे. ग्रामस्थांनी जे कार्य केले तेच आम्हाला पूढे घेऊन जात आहोत, नांदोस गढीचा इतिहास समोर आल्यावर देशाच्या नकाशावर नांदोसचे नाव ठळकपणे येईल, असेही मंत्री शेलार म्हणाले.
यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, नांदोस येथील गढी उत्खननाचा स्तुत्य उपक्रम मंत्री आशिष शेलार यांनी हाती घेतला आहे आपला इतिहास आपल्याला कळला पाहिजे, त्याचे संकलन झाले पाहिजे, आणि हे काम मंत्री शेलार करू शकतात. कारण ना. शेलार ज्या विषयात हात घालतात तो विषय शेवटपर्यंत घेऊन जातात, असे सांगून आम. राणे म्हणाले, मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहासाठी ना. आशिष शेलार यांनी १३ कोटी रुपये निधी देण्याचा शब्द दिला होता, मात्र यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, त्यामुळे याबाबत ना. शेलार यांनी लक्ष घालून निधी मिळण्यातील अडचण दूर करावी. त्याचप्रमाणे दशावतार कलाकारांच्या अडचणी कलाकारांच्या समितीच्या माध्यमातून आपण ना. शेलार यांच्याकडे मांडल्यावर अडचणी समजून घेऊन दशावतार कलाकारांना ओळखपत्र, प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णय काढून तात्काळ कार्यवाही सुरु केल्याबद्दल मी आभार मानतो. मात्र ओळखपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीत काही अडचणी येत असून त्या दूर कराव्यात असेही आम. निलेश राणे म्हणाले.
यावेळी कट्टा येथील वराडकर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. ममता महेश आंगचेकर हिने रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र तसेच ललित विलास मेस्त्री या विद्यार्थ्यांने लाकडात कोरलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि नांदोस गढी विषयी ईशा गावडे या विद्यार्थिनी लिहिलेला माहितीपूर्ण लेख असणारा वराडकर हायस्कूल कट्टा यांचा वंदना हा वार्षीकांक कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मंत्री शेलार यांना भेट म्हणून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण साटम यांनी केले तर आभार विलास वहाने मानले

Subscribe to my channel




