खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक घरभेदीच : घावनळेतील शिवसेना प्रवेशामुळे झाले स्पष्ट
काँग्रेस नेते कै. आबा मुंज यांच्या अकाली निधनानंतर एकाकी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मटणाच्या पार्ट्या देऊन शिवसेनेत प्रवेश
भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्याकडून शिवसेनेतील “त्या” पक्ष प्रवेशाची लक्तरे वेशीवर
कुणाल मांजरेकर
कुडाळ : घावनळे मतदार संघ नेहमीच काँग्रेस नेते कै. आबा मुंज यांचा बालेकिल्ला होता. कै. आबांनी दिनेश वारंग यांच्या सारखे अनेक कार्यकर्ते घडवले. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांना वेळोवेळी मदत केली. मात्र आबांच्या अकाली निधनानंतर महिन्याभरातच त्यांच्याच गावात मटणाच्या पार्ट्या देऊन डाव साधत एकाकी झालेले काँगेसचे कार्यकर्ते फोडत आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी आपल्या असंवेदनशीलतेच आणि नीच प्रवृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन दाखवून दिले आहे. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे घरभेदीच आहेत आणि कालचा प्रवेश हे त्याचं उत्तम उदाहरण असल्याच्या शब्दांत भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी घावनळे मधील शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेऊन राणेसाहेबांना धोबीपछाड दिल्याच्या आविर्भावात शिवसेनेचे नेते वावरत असल्याची टीकाही श्री. साईल यांनी केली आहे.
दादा साईल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी घावनळे सरपंच दिनेश वारंग यांनी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या ग्रामपंचायत मधल्या एकाही सहकारी किंवा सदस्याने प्रवेश केला नाही. मात्र विनायक राऊत आणि वैभव नाईक घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघात फार मोठी उलथापालथ केल्याच्या तसेच भाजपा आणि राणेसाहेबांना फार मोठी धोबीपछाड दिल्याच्या अविर्भावात वावरत आहेत.
खरं पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रितरित्या सत्तेत आहेत. ते सुखात नांदत असतील अशी आमची अपेक्षा होती. मात्र खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे घरभेदीच आहेत आणि कालचा प्रवेश हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फोडत काँग्रेस मधून शिवसेनेत झालेल्या या प्रवेशानंतर पालकमंत्री उदय सामंत आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी मात्र नेहमीप्रमाणे भाजप व राणे साहेबांवर टीका करत आपली मीडियातील नसलेली किंमत वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रवेशकर्त्यांना लाखांच्या विकासकामांचे आश्वासन देत हे करत असलेले प्रवेश हास्यास्पद आहेत. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी आतापर्यंत दिलेली किती आश्वासन पूर्ण केलीत हे जाहीर करावे. खासदार दत्तक गाव शिवापूर मधील परिस्थिती आणि कुडाळ मालवण मधील रस्त्यांची परिस्थिती बघता या लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तृत्व लोकांच्या लक्षात आले आहे, असे दादा साईल यांनी म्हटले आहे.