गोकुळ अध्यक्षपदाचा फैसला १० नोव्हेंबरला!

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण आदेश; सकाळी ११ वाजता पुन्हा सभा घेण्याचे निर्देश

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा निर्णायक वळणावर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीसाठी दुसरी सभा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आता १३ विरुद्ध १२ असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भात सुमारे तीन तास सुनावणी झाली. न्यायालयाने आज, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गोकुळच्या सर्व २५ नवनिर्वाचित संचालकांना सात दिवसांची नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. २९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, महायुतीच्या १२ संचालकांनी या सभेला अनुपस्थिती दर्शविल्याने आवश्यक १४ संचालकांचा कोरम पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा केला होता.

या घडामोडीनंतर समविचारी आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार १५ दिवसांच्या आत अध्यक्ष निवड होणे आवश्यक असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. आता न्यायालयाच्या आदेशानुसार १० नोव्हेंबरला पुन्हा अध्यक्ष निवडीची सभा होणार आहे. या सभेत समविचारी आघाडीचे १३ आणि महायुतीचे १२ संचालक आमनेसामने येणार असल्याने गोकुळच्या सत्तेचा अंतिम फैसला कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!