तोंडवळी-तळाशील किनारपट्टीला मिळणार संरक्षणाचे कवच!

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत १५ कोटींच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन

दीड किलोमीटर लांबीचा बंधारा उभारणार; तळाशील-सर्जेकोट-रेवंडी जोडणाऱ्या पुलासाठीही प्रयत्न

मालवण : समुद्राच्या उधाणामुळे किनारपट्टीची होणारी धूप आणि तळाशील येथील वस्तीला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे. तोंडवळी-तळाशील किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली असून, सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी कामाचे भूमिपूजन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

आचरा विभागातील तोंडवळी, तळाशील आणि आचरा परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. या विकासकामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांना बळकटी मिळण्यासोबतच स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे. तळाशील हा भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील परिसर आहे. एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र अशा स्थितीत वसलेल्या या गावाला समुद्राच्या लाटांचा सातत्याने सामना करावा लागतो. विशेषतः समुद्राला उधाण येण्याच्या काळात किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याने येथील लोकवस्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती.

या मागणीची दखल घेत आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सध्या १५ कोटी रुपयांचे काम हाती घेण्यात आले असून, येत्या सहा महिन्यांत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. याशिवाय उर्वरित दीड कोटी रुपयांच्या निधीतून बंधाऱ्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे. एकूण सुमारे दीड किलोमीटर लांबीचा भक्कम धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात येणार असून, त्यामुळे तोंडवळी-तळाशील किनारपट्टीला मोठे संरक्षण मिळणार आहे.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली विकासकामे सातत्याने हाती घेतली जात आहेत. जनतेने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरणे ही आमची जबाबदारी आहे. लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तोंडवळी-तळाशीलच्या किनारपट्टी संरक्षणाचा प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावला जाईल.

तोंडवळी-तळाशील-सर्जेकोट जोडणाऱ्या पुलासाठीही प्रयत्न!

दरम्यान, तोंडवळी-तळाशीलला सर्जेकोटशी जोडणारा पूल उभारल्यास मालवण ते तळाशील हे अंतर कमी होऊन या भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते, अशी मागणी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी आमदार निलेश राणे यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना आमदार राणे यांनी तळाशील-सर्जेकोट-रेवंडी परिसराला जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. या पुलाबाबत सर्वेक्षण करून लवकरात लवकर काम सुरू होण्याच्या दृष्टीने आपण लक्ष घालणार असून, परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, आरोग्य सभापती सभापती पूनम चव्हाण, तोंडवळीचे सरपंच तोंडवळकर, जेरोन फर्नांडिस, गणेश तोंडवळकर, वर्षा सांबारी, महेश राणे, संतोष कोदे, संजय केळुसकर, प्रफुल्ल प्रभू, जयहरी कोचरेकर, बबन शिंदे, संजय तारी, बाबू परुळेकर, संतोष मिराशी, चावलं मुजावर, बाबू कदम, उदय घाडी यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!