
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भेट : सांडपाणी वाहून जाण्यासाठी केल्या उपाययोजना
एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वखर्चाने गटार साफसफाई : आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
दरवर्षीच्या पावसाळ्यात मालवण एसटी स्टँड समोर पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील स्थानिक नगरसेविका तथा नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पुनम चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी त्यांनी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि अन्य सहकारी नगरसेवकांसह बसस्थानक परिसराला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणच्या सांडपाण्याचा त्रास एसटी आगारालाही सहन करावा लागत असल्याने एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने गटार साफसफाईला सुरुवात केली आहे. याची पाहणी करून नगरपरिषदेकडून या साफसफाई मोहिमेला सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती सौ. चव्हाण यांनी देऊन एसटी डेपोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. बस स्थानकसमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचू नये, यासाठी येथील मोरीची देखील साफसफाई केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
बसस्थानक परिसरातील पावसाळी पाणी वाहणाऱ्या गटारात मोठ्या प्रमाणावर झाडी वाढलेली होती. तसेच माती कचरा होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेली १० वर्षे या गटाराची साफसफाई झाली नव्हती. त्यामुळे येथून पाणी वाहण्याचा मार्ग बंद झाला होता. त्याची एसटी अधिकारी व कर्मचारी यांनी स्वखर्चाने साफसफाई केली आहे. त्यांच्या या साफसफाई मोहिमेला नगरपालिके मार्फत सहकार्य करण्यात येत आहे. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका अश्विनी कांदळकर, मोहन वराडकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्यासह पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आगार व्यवस्थापक सूर्यवंशी, स्वप्नील गडदे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. बस स्थानका समोरील मोरीत माती व कचरा मोठ्या प्रमाणात साचला असून पालिकेमार्फत त्याची देखील सफाई करुन या परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये, या करिता प्रयत्न केले जाणार असल्याचे सौ. पूनम चव्हाण यांनी सांगितले.






Subscribe to my channel






