तारकर्ली गावच्या नावलौकीकाला साजेसे काम करा !
माजी खासदार निलेश राणेंचे प्रतिपादन ; ग्रामपंचायतीच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे उदघाटन
मालवण : तारकर्ली गावाने जागतिक पर्यटन नकाशावर स्वतःचे स्थान कोरले आहे. त्यामुळे या गावच्या ग्रामपंचायतीची देखील मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून तारकर्ली ग्रामपंचायतीने स्वतःच्या नावलौकिकाला साजेसे काम करावे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी तारकर्ली येथे बोलताना केले. तारकर्ली ग्रामपंचायतीच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन श्री. राणेंच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, आनंद शिरवलकर, महेश मांजरेकर, सरपंच सौ. स्नेहा केरकर, डॉ. जितेंद्र केरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, तारकर्लीचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर गेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये कारभार देखील तसाच दर्जेदार झाला पाहिजे. या गावात सीआरझेडची समस्या असून ही इमारत नुतनीकरण करताना किती अडचणी निर्माण झाल्या आणि त्यातून सरपंच सौ. केरकर यांनी कशा पद्धतीने मार्ग काढला, हे वाखाणण्याजोगे आहे. आज तारकर्ली सारखी ग्रामपंचायत एका चांगल्या हातात आहे, आपण या गावाला १०० % न्याय द्याल, असे सांगून आज राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत. त्यांचा राज्यसभेचा निधीही असून गावच्या विकास कामांसाठी जेव्हा आमची गरज लागेल, तेव्हा हक्काने हाक मारा, असे निलेश राणे म्हणाले.
आज किनारपट्टी भागात सीआरझेडचा अधिकारी वर्गाकडून नाहक बाऊ केला जातो. एक वीट जरी हलवायची झाली तरी फार मोठी अडचण निर्माण केली जाते. सीआरझेड मध्ये देखील बांधकाम करता येतं. पण अनेक अधिकारी आपल्याला घाबरवून ठेवतात. अशा परिस्थितीत देखील अनेक अडचणींवर मात करून तारकर्ली ग्रामपंचायतीने चांगली इमारत उभी केली आहे, यापुढील काळात पर्यटन क्षेत्रात तारकर्ली ज्या वेगाने पुढे जात आहे, त्याच वेगाने आपला कारभार पुढे गेला पाहिजे. आज पर्यटक गोव्याला कमी जातात, पण वॉटरस्पोर्ट्ससाठी तारकर्लीला येतात.त्यामुळे तारकर्ली ग्रामपंचायतीवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्याचे भान ठेवून काम करा, असे आवाहन निलेश राणेंनी केले.
नारायण राणेंमुळे ग्रा. पं. इमारतीला चालना : सरपंच
तारकर्ली ग्रामपंचायत इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे चालना मिळाल्याचे सरपंच सौ. स्नेहा केरकर यांनी सांगितले. या गावात सीआरझेडचा प्रश्न असल्याने आपण ना. राणेंना विनंती केल्यानंतर राणेसाहेबांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यामुळेच या इमारतीच्या कामाला चालना मिळाली. म्हणूनच या इमारतीचे उद्घाटन निलेश राणेंच्या हस्ते करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.