बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार

मालवण नगरपरिषदेची ठोस उपाययोजना; बोअरवेल खोदाई कामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ

पर्यटन हंगामापूर्वी नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी नगरपरिषदेची तत्पर कार्यवाही

मालवण : मालवण बंदर जेटी येथील सार्वजनिक प्रसाधनगृहातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रसाधनगृहात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध व्हावा आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागावा, या उद्देशाने नगरपरिषदेच्या माध्यमातून बोअरवेल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

मालवण बंदर जेटी परिसरात स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथील सार्वजनिक प्रसाधनगृहात नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, पाण्याच्या कमतरतेमुळे प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेवर परिणाम होत होता. ही समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने बोअरवेल उभारणीचा निर्णय घेतला आहे.

आगामी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर नगरपरिषदेने लक्ष केंद्रित केले आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या बोअरवेलमुळे प्रसाधनगृहासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, नागरिक आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

केवळ समस्या समोर आल्यानंतर प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रत्यक्ष उपाययोजना करण्यावर नगरपरिषदेने भर दिला असून, बंदर जेटी परिसरातील स्वच्छता आणि सुविधांच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कार्यवाही मानली जात आहे. या शुभारंभप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, उद्योजक मोहन वराडकर, जॉन नरोन्हा, भाई मांजरेकर, कमलेश कोचरेकर, संदीप मालंडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!