सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठी अर्जाची मुदत वाढली…

उमेदवारांना आता २५ सप्टेंबरपर्यंत संधी; जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना मोठा दिलासा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने टीसीएस (TCS) कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी १७ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. आता पात्र उमेदवारांना २५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवक-युवतींना या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

७० टक्के जागा सिंधुदुर्गातील उमेदवारांसाठी

या भरती प्रक्रियेतील ७० टक्के जागा शासनाच्या निर्देशांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी पात्र उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर उर्वरित ३० टक्के जागांसाठी इतर पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींसाठी ही रोजगाराची महत्त्वपूर्ण संधी मानली जात आहे. मुदतवाढीचा लाभ घेत जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती, पात्रता, अटी-शर्ती तसेच ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला www.sindhudurgdcc.bank.in भेट द्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.

error: Content is protected !!