आमदार प्रमोद जठार यांचा ओबीसी बांधवांतर्फे उद्या कासार्डेत नागरी सत्कार

कणकवली : वैश्य वाणी समाजातील काही विशेष घटकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमदार झाल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आमदार प्रमोद जठार यांचा ओबीसी बांधवांतर्फे रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता, अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

वैश्य वाणी समाजाच्या ओबीसी प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर त्याची पडताळणी करून महायुती सरकारने येणाऱ्या अडचणी दूर करून परिपत्रक काढून दिलासा दिला आहे. याबद्दल महायुती सरकारचेही ओबीसी समाजाच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत. तसेच ‘हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तिन्ही जाती एकच आहेत’, असा निर्वाळा देत राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

या निर्णयामुळे वैश्यवाणी जातीच्या नागरिकांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रमोद जठार यांचा ओबीसी बांधवांतर्फे नागरी सत्कार होणार आहे. तरी सर्व समाजबांधवांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संजय विठ्ठल नकाशे आणि दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!