जलसंधारणाच्या कामांचा परिणाम आता AI तंत्रज्ञानातून मोजणार

‘sindhudurg.ai’ प्रणालीचा होणार वापर; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर सॉफ्टलॅब्स ग्रुपचे सादरीकरण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची परिणामकारकता आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तपासली जाणार आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांसह विविध जलसंधारण प्रकल्पांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी सॉफ्टलॅब्स ग्रुप, मालवण यांनी विकसित केलेल्या ‘sindhudurg.ai’ या डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर या प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. जलसंधारणाच्या कामांमुळे स्थानिक जलस्रोतांमध्ये झालेले बदल, बंधाऱ्यांच्या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीतील चढ-उतार आणि या कामांची प्रत्यक्ष परिणामकारकता यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रणालीचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी प्रणाली अपग्रेड करून आवश्यक माहितीचे संकलन आणि शास्त्रीय विश्लेषण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

error: Content is protected !!