मालवणच्या समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेचा जल्लोष; परंपरा, श्रद्धा अन् उत्साहाचा संगम

ढोल-ताशांचा गजर, नारळ लढविण्याच्या रंगलेल्या स्पर्धा अन् समुद्राला सुख-समृद्धीचे साकडे; ऐतिहासिक परंपरेला लाभला उत्साहाचा साज

आमदार निलेश राणे, व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन मान्यवरांच्या उपस्थितीत सागराला श्रीफळ अर्पण

मालवण : शिवकालीन परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या मालवणच्या ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवाला यंदा भक्ती, परंपरा आणि उत्साहाची अनोखी किनार लाभली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण झाल्यानंतर मालवणच्या समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेचा जल्लोष पाहायला मिळाला. व्यापारी, मच्छिमार, नागरिक, महिला आणि बच्चे कंपनीने मोठ्या उत्साहात सहभागी होत सागराला सुख-समृद्धीचे साकडे घातले.नारळी पौर्णिमेनिमित्त दुपारी साडेतीनच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचा श्रीफळ अर्पण करण्यात आला.

या पारंपरिक सोहळ्यानंतर मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिरापासून व्यापारी बांधवांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात श्रीफळाची मिरवणूक काढली. वाजत-गाजत ही मिरवणूक बंदर जेटी परिसरात दाखल झाली.समुद्रकिनारी आणलेल्या श्रीफळाचे मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे उपस्थित होते. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण झाल्यानंतर उमेश नेरुरकर यांनी व्यापारी बांधवांच्या वतीने समुद्राला श्रीफळ अर्पण केले. “मालवणवासीयांच्या धंद्यात बरकत दे आणि सर्वांना सुखी ठेव,” असे गाऱ्हाणे घालत त्यांनी सागराला साकडे घातले.

या पारंपरिक सोहळ्यास माजी आमदार वैभव नाईक यांनीही उपस्थित राहून सागराला श्रीफळ अर्पण केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला व बालकल्याण सभापती तथा भाजप महिला शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, ललित चव्हाण, महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नगरसेविका मेघा सावंत, अश्विनी आचरेकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, दीपलक्ष्मी पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

समुद्रकिनारा गर्दीने फुलला

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने बंदर जेटी आणि समुद्रकिनारा नागरिकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिला, युवक, बच्चे कंपनी तसेच व्यापारी आणि मच्छिमार बांधवांच्या उपस्थितीने उत्सवाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले. जेटी परिसरात युवक आणि बच्चेकंपनीमध्ये नारळ लढविण्याचा पारंपरिक खेळ रंगला. नारळ फुटण्याच्या प्रत्येक फटक्यासोबत उपस्थितांच्या उत्साहाला उधाण येत होते. समुद्रकिनारी आयोजित कबड्डी स्पर्धेनेही वातावरणात रंग भरला.

महिला-पुरुषांच्या नारळ लढविण्याच्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून यंदाही मालवण बंदर जेटीवर विविध आयोजकांच्या वतीने महिला आणि पुरुषांसाठी नारळ लढविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला स्पर्धा, मनोरंजन आणि सांस्कृतिक परंपरेची जोड मिळाल्याने मालवणचा समुद्रकिनारा दिवसभर उत्साहाने दुमदुमून गेला.

श्रीफळ अर्पण करून सागराची पूजा, मच्छिमार बांधवांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना आणि व्यापार-व्यवसायात भरभराटीचे गाऱ्हाणे अशा भक्तिमय वातावरणात मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव अविस्मरणीय ठरला.

error: Content is protected !!