
यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; दिमाखदार संचलनाने वेधले लक्ष
सावंतवाडी : तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीची ऊर्जा, शिस्तबद्ध संचलनाचा दिमाख आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना मनामनात जागवली.
श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन केले. यावेळी संस्थेचे सीईओ लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, सैनिक स्कूलचे प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, ‘जन गण मन’ आणि ‘झंडा ऊँचा रहे हमारा’ या राष्ट्रगीत व ध्वजगीतांच्या सादरीकरणातून देशप्रेमाची भावना व्यक्त केली. भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या ध्वजाचेही ध्वजारोहण करण्यात आले.
दिमाखदार संचलनाने भारावले वातावरण
सैनिक स्कूलच्या शिस्तीचे आणि प्रशिक्षणाचे दर्शन घडविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिमाखदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. टापटीप गणवेश, शिस्तबद्ध पावले आणि जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज तसेच उपस्थित मान्यवरांना मानवंदना देत आपल्या शिस्तीची आणि राष्ट्रनिष्ठेची प्रभावी झलक दाखवून दिली.
नालंदा सभागृहात देशभक्तीचा रंग
यानंतर नालंदा सभागृहात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत वाढली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, संगीत आणि प्रभावी भाषणांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. त्यांच्या कलागुणांसोबतच देशप्रेमाची भावना या कार्यक्रमातून प्रभावीपणे उमटली.
विविध देशभक्तीपर स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेसिडा डिसोझा यांनी केले.
समारोपप्रसंगी प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन केले. देशाप्रती कर्तव्य, शिस्त, जबाबदारी आणि राष्ट्रनिष्ठा ही मूल्ये जीवनात सदैव जपण्याचा संदेश त्यांनी दिला. तिरंग्याला मानवंदना, शिस्तीचा संस्कार आणि देशप्रेमाची प्रेरणा अशा त्रिसूत्रीने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.






Subscribe to my channel






