मालवणात पोलिसांचे “शक्तीप्रदर्शन”

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी २१ डिसेंबर रोजी होत आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालवण पोलीस दलाच्या वतीने सायंकाळी शहरातून संचलन करत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

मालवण बस डेपो येथून सुरू झालेले हे संचलन मुख्य बाजारपेठ आणि शहराच्या प्रमुख मार्गावरून नेत मालवण पोलीस स्टेशन येथे त्याची सांगता झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या संचलनाचे नेतृत्व मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले. मतमोजणीसाठी बंदोबस्ता करता राज्य राखीव दल आणि दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

संचलनात राज्य राखीव पोलीस दल (SRPF) २५ जवान, दंगल नियंत्रण पोलीस (RCP) ३० जवान, स्ट्रायकिंग फोर्स १५ जवान, पोलीस अंमलदार ६० कर्मचारी, होमगार्डः ३५ जवान अशा प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात असणार आहे. विजेत्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करताना नियमांचे पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

error: Content is protected !!