डॉ. शिल्पा झाट्ये लिखित कवितेच्या शब्दफुलांनी सजला ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’…!

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन

कवितेतून प्रेम, करुणा, संघर्ष आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद

मालवण (कुणाल मांजरेकर)

येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या लिटरेचर असोसिएशनच्या वतीने डॉ. शिल्पा झांट्ये लिखित ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच त्यावर आधारित परिसंवाद उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयातील झांट्ये सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. राबते, कवयित्री डॉ. शिल्पा झांट्ये, काव्यसंग्रहाचे अनुवादक व सीडीसी सदस्य गुरुनाथ राणे, ॲड. आश्लेषा मोरवेकर, प्रा. डॉ. हंबीरराव चौगुले, प्रा. डॉ. उज्वला सामंत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

परिसंवादात ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’ या काव्यसंग्रहाच्या आशयावर आणि साहित्यिक वैशिष्ट्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रा. डॉ. उज्वला सामंत, प्रा. के. के. राबते आणि ॲड. आश्लेषा मोरवेकर यांनी काव्यसंग्रहातील विविध कवितांचा संदर्भ देत त्यांचे विश्लेषण केले.

काव्यसंग्रहाचे अनुवादक गुरुनाथ राणे यांनी अनुवाद प्रक्रियेतील अनुभव कथन करताना या कविता मानवी जीवनातील विविध अनुभव मांडणाऱ्या असून हिंसाचाराला विरोध करणारा आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणारा आशय त्यातून व्यक्त होतो, असे सांगितले. या कविता वाचकाला जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात, असेही त्यांनी नमूद केले.

प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. राबते यांनी कवितेचे महत्त्व अधोरेखित करताना, “या कवितांमधून प्रेम, करुणा, संघर्ष आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळते. त्यामध्ये संवेदनशीलता असून जीवनाकडे कसे पाहावे आणि कसे जगावे, याचे मार्गदर्शन मिळते,” असे सांगितले. ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’ हा शब्दमय उत्सव आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी काव्यसंग्रहातील विविध कवितांचा उल्लेख करताना त्या दैनंदिन जीवनातील अनुभव प्रभावीपणे मांडतात, असे सांगितले. महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच महिलांनी सक्षम आणि सशक्त कसे व्हावे, याचा संदेशही या कवितांमधून मिळतो, असे त्यांनी नमूद केले.

ॲड. आश्लेषा मोरवेकर यांनी शब्दांच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकताना नेल्सन मंडेला आणि अलेक्झांडर द ग्रेट यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे दिली. रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्ये समाजाला आणि पिढ्यांना कशी प्रेरणा देतात, याचे विवेचन करत त्यांनी कवितेत आणि शब्दांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद असल्याचे सांगितले.

कवयित्री डॉ. शिल्पा झांट्ये यांनी आपल्या कवितांच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या बोलण्यातून सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवली. या कविता प्रसिद्धी किंवा धनप्राप्तीसाठी नव्हे, तर समाजाच्या हितासाठी लिहिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कम्पॅरिजन’ आणि ‘इट द एलिफंट’ यांसारख्या कवितांचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना कवितेचे महत्त्व पटवून दिले. चांगले कर्म करावे, सकारात्मक गोष्टी इतरांसोबत शेअर कराव्यात आणि आपले छंद जोपासावेत, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय भाषणात साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आपण जसा विचार करतो, त्याप्रमाणे कृती करण्याची गरज असून या कविता जीवन कसे जगावे आणि सर्वोत्तम कसे व्हावे, याची प्रेरणा देतात, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून अष्टपैलू बनण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. हंबीरराव चौगुले यांनी केले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. एस. पी. खोबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. लिटरेचर असोसिएशनच्या या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!