
कांदळगाव प्रशालेसाठी वॉटर प्युरीफायर ; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली
मालवण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवण तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वही वाटप अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १९ ऑगस्ट रोजी ओझर विद्यामंदिर, कांदळगाव प्रशालेत वही वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच तीन विद्यार्थिनींना दत्तक व प्रशालेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि शहराध्यक्ष सागर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.
वही वाटपापलीकडे सामाजिक बांधिलकी; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारी
या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी तीन विद्यार्थिनींना दप्तर, कंपास पेटी आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे, तर या तिन्ही विद्यार्थिनींचा वार्षिक शैक्षणिक खर्च स्वतः उचलण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.
प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सुविधेचा विचार करून अन्ननसिएशन यांनी वॉटर प्युरिफायरही स्वखर्चाने भेट दिला. त्यामुळे केवळ राजकीय उपक्रम न राबविता विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देण्याचा मनसेचा प्रयत्न या निमित्ताने अधोरेखित झाला.
विद्यार्थी, शिक्षक-पालकांकडून उपक्रमाचे कौतुक
शैक्षणिक साहित्याअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी मनसेच्या माध्यमातून सुरू असलेले हे अभियान तालुक्यातील विविध शाळांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून कौतुक व स्वागत करण्यात येत आहे.
कार्यक्रमाला शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव, सहायक शिक्षक सावंत, पी. के. राणे, प्रवीण पारकर, अभय शेर्लेकर, शिक्षिका सोनाली कोदे (तळाशीळकर), ट्रेनी शिक्षिका हर्षाली कांदळगावकर, शालेय कर्मचारी दादा परुळेकर, खोडके यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.






Subscribe to my channel






