वायरी भूतनाथ ग्रामसभेत गोंधळ, प्रशासकीय कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक !

इतिवृत परिपूर्ण नसल्याने ग्रामस्थांचा संताप ; ग्रामसभा स्थगित करण्याची वेळ

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीची तहकुब ग्रामसभा काल (सोमवारी) घेण्यात आली. या ग्रामसभेत मागील सभांचे इतिवृत्त परिपूर्ण नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला. मुळात तहकूब ग्रामसभा सात दिवसात घेणे आवश्यक असताना ही ग्रामसभा लावण्यास मोठी दिरंगाई करण्यात आली असून मागील सभेत ग्रामस्थांनी मांडलेले अनेक मुद्दे इतिवृत्तात न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ही ग्रामसभा देखील स्थगित करावी लागली. ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभारा विरोधात नाराजी व्यक्त केली.

वायरी भूतनाथ ग्राम पंचायतीच्या कालच्या स्थगित ग्रामसभेसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र मागील तीन सभांचे इतिवृत्त सदोष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करून तीव्र नाराजी व्यक्त केली. यावरून सरपंच भगवान लुडबे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, ग्रामसेवक यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. इतिवृत्तच सदोष असल्याने ही ग्रामसभा देखील स्थगित करण्यात आली.

दरम्यान, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सागर देसाई यांच्याशी संपर्क केला असता कालच्या ग्रामसभेतील इतिवृत्ताला ग्रामस्थांची हरकत असल्याने ही ग्रामसभा पुढे चालू शकली नसल्याने ती स्थगित झाल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २६ जानेवारीला ग्रामसभा होणार असल्याने कायद्यानुसार त्यापूर्वी अगोदरची ग्रामसभा पूर्ण करावी लागते. त्यामुळे कालची ग्रामसभा लावण्यात आली होती. मात्र ती स्थगित झाल्याने आता १६ जानेवारीला ही स्थगित ग्रामसभा लावण्यात आली आहे, असे ते म्हणाले. आज सायंकाळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या ग्रामसभेबाबत विचारले असता आचारसंहिता लागली तरी ग्रामसभा लावता येते, मात्र त्यात धोरणात्मक निर्णय घेता येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले

error: Content is protected !!