सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन लवकरच होणार सन्मान


मालवण | कुणाल मांजरेकर
सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये तांत्रिक संवर्ग (स्थापत्य) विभागातून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती/पुलांची संकल्पना तयार करुन व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनवताना तसेच, सार्वजनिक इमारतीची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते, अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी “अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते.
सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांना सन २०२४-२५ या कालावधीकरीता वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. यात कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांचाही समावेश आहे.
मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर याठिकाणी पुन्हा एकदा भव्य दिव्य शिवपुतळा उभारण्याचे काम कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या देखरेखी खाली पार पडले. दर्जेदार पद्धतीने नियोजित वेळेत हे काम पूर्ण झाल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता. तसेच सावंतवाडी व कुडाळ रेल्वे स्थानक सुशोभीकरण, वेंगुर्ला विश्रामगृह, सावंतवाडी विभागातील अनेक पूल व रस्ते, दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, महादेवगड आंबोली सुशोभीकरण, सिंधुरत्न योजने अंतर्गत अनेक कामे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. विद्यमान परिस्थितीत श्रीरामवाडी ते निवती पादचारी पूल, Fishing village, वेंगुर्ला, आंबोली विश्रामगृह, कुडाळ विश्रामगृह, सावंतवाडी प्रांत ऑफिस, कुडाळ न्यायालय इमारतीचे काम, दुकानवाड पूल आदी कामे त्यांच्या नियोजनाखाली सुरु आहेत.

Subscribe to my channel




