
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी; नुकसानभरपाईसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार
मालवण : तारकर्ली वरचीवाडी येथे कांदळगावकर रापण संघाच्या कावनाला शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत मासेमारी साहित्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कांदळगावकर कुटुंबाला भारतीय जनता पक्षाने दिलासा दिला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करून नुकसानग्रस्त कुटुंबीयांना धीर दिला.
या आगीच्या घटनेमागे कोणत्याही वाईट प्रवृत्तीचा हात असल्यास त्यादृष्टीने सखोल चौकशी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
शुक्रवारी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत एक होडी पूर्णपणे जळून खाक झाली, तर दुसऱ्या होडीचेही मोठे नुकसान झाले. याशिवाय रापणीची जाळी आणि मासेमारीसाठी लागणारे अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कष्टाने उभा केलेला मासेमारीचा संसार एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याने कांदळगावकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेमुळे मच्छीमार समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.
पूर्वीही अशीच घटना; संशयाची सखोल चौकशी करण्याची मागणी
विशेष म्हणजे, यापूर्वीही अशाच प्रकारची आग लागून नौका आणि जाळ्यांचे नुकसान झाल्याचे कांदळगावकर कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे सध्याच्या घटनेमागे अज्ञात व्यक्तीचा हात असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळाच्या परिसरातील मोबाईल लोकेशनसह उपलब्ध पुराव्यांची तपासणी करून आगीचे नेमके कारण शोधावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. मच्छीमारांच्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत, पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधून निष्पक्ष चौकशीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, पंकज सादये, शाम झाड, केदार झाड, संदीप बोडवे, जयवंत सावंत, मिलिंद झाड, मोहन कुबल, सुरेश बापार्डेकर यांच्यासह गुंडू कांदळगावकर, अनिल टिकम, साई लोणे, राजाराम खराडे, दयानंद कुबल, रामचंद्र कांबळी, चेतन सारंग, पिंटो टिकम, बाबली कांदळगावकर, सुहास केळुसकर, कुंदन धुरत आदी उपस्थित होते.







Subscribe to my channel






