
सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासोबतच स्थानिक तरुण, उद्योजक, स्वयंसहाय्यता गट व संस्थांना रोजगार आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘डिजिटल भारत निधी’ (DBN)च्या पाठबळावर ‘भारतनेट उद्यमी’ (BNU) योजना राबविण्यात येत आहे. ‘भारतनेट’ हा जगातील सर्वात मोठ्या ग्रामीण दूरसंचार प्रकल्पांपैकी एक असून, देशातील सुमारे 2.6 लाख ग्रामपंचायतींसह मागणीनुसार सर्व लोकवस्ती असलेल्या गावांपर्यंत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
सुधारित भारतनेट कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील घरे व संस्थांना 1.5 कोटी फायबर-टू-द-होम (FTTH) कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी एप्रिल 2025 मध्ये भारत सरकारच्या डिजिटल भारत निधीने बीएसएनएलसोबत ‘वापर करार’ केला आहे. त्यानुसार गावागावांत अंतिम टप्प्यातील एफटीटीएच कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी ‘भारतनेट उद्यमी’च्या माध्यमातून सेवा विस्ताराचे काम करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील इच्छुक तरुण, उद्योजक, स्वयंसहाय्यता गट, संस्था व इतर भागधारकांनी ‘भारतनेट उद्यमी’ योजनेत सहभागी होऊन डिजिटल सेवा विस्तारात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत होण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, उद्योजकतेला चालना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. इच्छुकांनी बीएसएनएलच्या भारतनेट पार्टनर पोर्टलवर https://ruralftth.bsnl.in/BNet/# नोंदणी करून या उद्योजकतेच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्रीमती टक्केकर, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी, बीएसएनएल, सिंधुदुर्ग, ई-मेल mktgsvd@gmail.com, दूरध्वनी क्रमांक 02362-273896, 271400, 9403362208 यावर संपर्क साधावा.






Subscribe to my channel






