

कुंभारमाठ येथील दुर्घटना ; अर्टिगा मधील चार युवक जखमी
मालवण : पर्यटनासाठी मालवणात आलेले पर्यटक हे माघारी फिरत असताना त्यांच्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बॅलेनो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार युवक जखमी झाले. ही धडक इतकी जबरदस्त होती की उभी असलेली बॅलेनो गाडी दहा फूट पुढे जाऊन दगडी कंपाउंडला धडकली तर अर्टिगा कार पंचवीस फूट पुढे जाऊन एका झाडाला धडकली. या अपघातात अर्टिगा गाडीतील चार युवकांना दुखापत झाली असून त्यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर सुदैवाने बॅलेनो गाडीत कोणीही नसल्याने अनर्थ टळला. हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास कुंभारमाठ येथे घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे भोर येथून नऊ युवक शुक्रवारी मालवणात पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आनंद लुटल्यावर रविवारी सायंकाळी हे युवक अर्टिगा कारने (एम.एच. १२ टी.व्ही. १२०६) परतीच्या प्रवासासाठी निघाले. मालवण – कसाल मार्गावर कुंभारमाठ येथे अर्टिगा कार आली असता कारचालक केतन सणस याचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बॅलेनो कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की बलेनो गाडी दहा फूट पुढे जाऊन दगडी कंपाउंडला धडकली. सदर बलेनो कार (क्र. एम.एच. ०७ ए. जी. ८२०६) ही देवबाग येथील विवेक ताम्हणकर यांची असून ते अपघात घडण्यापूर्वी अर्धा तास अगोदरच कार कुंभारमाठ येथे लावून गोव्याला जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे सुदैवाने बलेनो कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
तर अर्टिगा कारने बलेनो कारला धडक दिल्यावर अर्टिगा कार देखील सुमारे पंचवीस फूट पुढे जाऊन एका झाडाला धडकून थांबली. या अपघातात अर्टिगा कारमधील ओंकार राजाराम धोंडे (वय २२), सिद्धेश तुकाराम धोंडे (वय २२), श्रेयस पांडुरंग सडांबर (वय २२), रोहित संभाजी चव्हाण (वय २२) (सर्व रा. भोर, पुणे) या चार युवकांना डोक्याला, डोळ्याला, दुखापती झाल्या. तर इतरांना मुका मार लागला आहे. अपघात घडल्यावर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमीना रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.



Subscribe to my channel




