मालवण : मालवण तालुक्यातील वराड तलावाची आमदार निलेश राणे यांनी पाहणी करून तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तलावातील गाळ उपसा, गळतीची दुरुस्ती तसेच अन्य तांत्रिक उपाययोजनांच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन सविस्तर अहवाल तयार करावा, अशा सूचना त्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांना दिल्या.
वराड तलाव परिसराची पाहणी करताना तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले. मात्र, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तसेच काही ठिकाणी गळती व इतर तांत्रिक अडचणींमुळे उपलब्ध क्षमतेचा अपेक्षित वापर होत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे तलावातील गाळाचा शास्त्रीय पद्धतीने उपसा करणे, गळती होत असलेल्या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती करणे आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक अन्य उपाययोजनांचा तांत्रिक अभ्यास करावा. या सर्व बाबींचा समावेश असलेला सविस्तर अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला दिले.
तालुक्यातील उपलब्ध जलस्रोत अधिक सक्षम करण्यासोबतच पाणी साठवण क्षमता वाढवून त्याचा दीर्घकालीन आणि प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिकाही आमदार निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केली. या पाहणीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.