‘२२ महिन्यांच्या आमदारांना रस्त्यांचा जाब; १० वर्षांच्या नेतृत्वाचा हिशोब कोण देणार?’

उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचा सवाल ; घोडगे-सोनवडे-कोल्हापूर मार्गाला मंजुरी ही राणेंच्या पाठपुराव्याची मोठी कामगिरी

मालवण : कुडाळ-मालवण मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांवरून आमदार निलेश राणे यांच्यावर सोशल मीडियातून टीका करणाऱ्यांना शिवसेना मालवण शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी चांगलेच सुनावले आहे. ‘२२ महिन्यांच्या आमदारांना रस्त्यांचा जाब विचारताना तब्बल १० वर्षे आमदार आणि १० वर्षे खासदार म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्यांचा हिशोबही जनतेसमोर ठेवणार का?’ असा थेट सवाल पाटकर यांनी उपस्थित केला आहे.

आमदार निलेश राणे हे नोव्हेंबर २०२४ मध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्या कार्यकाळाला अद्याप २२ महिने पूर्ण झाले आहेत. याउलट वैभव नाईक यांनी १० वर्षे आमदार म्हणून, तर विनायक राऊत यांनी १० वर्षे खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे आजच्या रस्त्यांच्या परिस्थितीचे खापर केवळ २२ महिन्यांच्या कार्यकाळावर फोडण्यापूर्वी मागील दोन दशकांच्या विकासाचा लेखाजोखा तपासण्याची गरज आहे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांमध्ये शेकडो किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे आहे. मालवण तालुक्यात ६१ किलोमीटर राज्य मार्ग, १४१ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्ग आणि ८८ किलोमीटर इतर जिल्हा मार्ग आहेत. कुडाळ तालुक्यात २७ किलोमीटर राष्ट्रीय मार्ग, ३९ किलोमीटर राज्य मार्ग, १५६ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्ग आणि १३५ किलोमीटर इतर जिल्हा मार्ग आहेत. एवढ्या मोठ्या रस्ते जाळ्याची जबाबदारी केवळ आमदार निधीतून पार पाडणे शक्य आहे का, याचेही उत्तर रील बनविणाऱ्यांनी जनतेला द्यावे, असा टोला पाटकर यांनी लगावला.

एका किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सुमारे १५ ते २० लाख रुपये खर्च येतो. त्यात आमदारांना मतदारसंघासाठी मिळणारा वार्षिक निधी मर्यादित असतो. त्यामुळे प्रत्येक रस्त्याचे काम आमदार निधीतून करणे शक्य नसते. अन्य शासकीय विभाग, योजना आणि राज्यस्तरीय निधीतून मोठी कामे मंजूर करून आणण्यासाठी लोकप्रतिनिधींना सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. महाराष्ट्रात २८८ आमदार असताना आपल्या मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणणे म्हणजे केवळ रील बनवण्याइतके सोपे काम नाही, असा जोरदार प्रहार पाटकर यांनी केला.

दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी अवघ्या २२ महिन्यांत कुडाळ-मालवण मतदार संघातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा पाटकर यांनी केला. त्याचे ठोस उदाहरण देताना १९९६ पासून रखडलेल्या घोडगे-सोनवडे-कोल्हापूर मार्गाला मंजुरी मिळवून देण्यात निलेश राणे यांचा पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे त्यांनी सांगितले.‘ज्यांच्या विरोधात रील बनवत आहात, त्यांची बाजूही ऐकून घ्या. अन्यथा अर्धवट माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. विकासाचा खरा हिशोब करायचा असेल तर तो २२ महिन्यांचा नव्हे, तर मागील १० वर्षांचा करा,’ असे आव्हानच दीपक पाटकर यांनी टीकाकारांना दिले आहे. ‘रीलच्या राजकारणापेक्षा वस्तुस्थितीचा आरसा जनतेसमोर ठेवा,’ असा थेट संदेशही त्यांनी दिला.

error: Content is protected !!