मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे काही रस्ते मुसळधार पावसात खड्डेमय बनले आहेत. गणेशोत्सव पूर्वी खड्डे बुजवून सर्व रस्ते सुस्थितीत करावेत. याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख अभि लाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकामचे मालवण उपविभागीय अभियंता अजित पाटील यांचे लक्ष वेधले.
युवासेना पदाधिकाऱ्यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला भेट देऊन चर्चा केली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह युवासेना तालुकाप्रमुख अभी लाड, वेरळ सरपंच धनंजय परब, महान सरपंच अक्षय तावडे, भाऊ राऊत, योगेश परब, उमेश सावंत आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात युवासेना जनसेवेसाठी कार्यरत असल्याचे संग्राम साळसकर यांनी सांगितले.