वाळू उपसाचा ‘तो’ स्पॉट बंद करणार- प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे ; १५ ऑगस्टच्या आंदोलनावर ग्रामस्थ ठाम…


मालवण : कालावल खाडीपात्रात तळाशील, रेवंडी या ठिकाणी अनधिकृतरित्या सुरू असलेल्या वाळू उपसावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त बनलेल्या ग्रामस्थांनी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयात धडक दिली. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत अनधिकृत वाळू उपसा बंद न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील. यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास आम्ही आत्मदहन करू असा इशारा तळाशील ग्रामस्थांनी यावेळी दिला.
दरम्यान, यावेळी झालेल्या चर्चेत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी ज्या ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे, तेथे महसूल, पोलीस आणि बंदर विभागाचे संयुक्त पथक कार्यरत ठेवत कडक कारवाई केली जाईल असे ग्रामस्थांना आश्वासन दिले. त्याचबरोबर कालावल खाडीकिनारीचे परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत, त्यांची आजच तपासणी करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
९ जून पासून वाळू उपसा बंद करण्यात आला आहे अशा परिस्थितीतही कालावल खाडीपात्रात तळाशील, रेवंडी या ठिकाणी पाच ते दहा होड्यांद्वारे अनधिकृतरित्या दिवस रात्री वाळू उपसा केला जात आहे. या संदर्भात वारंवार प्रशासनाचे निवेदन देऊन लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त बनलेल्या तळाशील ग्रामस्थांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रांत ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वर्षा झालटे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने, तळाशील ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर, केशर जुवाटकर, जान्हवी पराडकर, मंगल केळुसकर, स्नेहा कांदळगावकर, समीना केळुसकर, श्रीकृष्ण कांदळगावकर, पुंडलिक जुवाटकर, रवी कोचरेकर, गणपत शेलटकर, सचिन तारी, नंदकुमार कोचरेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तोंडवळी गावात कालावल खाडीपात्रात तळाशीलवाडी समोर रेवंडी या ठिकाणी अनधिकृत होड्यांद्वारे दिवस रात्र वाळू उपसा सुरू आहे. तळाशील समोरील कालावल खाडीपात्रात नांगर, दोऱ्या व काठ्या रोवून ठेवल्या आहेत. त्यामुळे तळाशील येथील पारंपरिक मच्छीमारांना मासेमारी करताना अडथळा निर्माण होत आहे. हा वाळू उपसा हरित न्यायालयाची बंदी असलेल्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे एक प्रकारे न्यायालयाचाही अवमान होत आहे. या अनधिकृत वाळू उपसा बाबत अनेकदा प्रशासनास निवेदन देऊन तसेच आंदोलन छेडून वाळू उपसा बंद करण्याबाबत मागणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. महसूल विभागाने नुकताच महसूल सप्ताह साजरा केला. मात्र अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांकडून शासनाचा महसूल लुटण्याचे काम केले जात आहे. मग महसूल सप्ताह साजरा करून उपयोगच काय? वाळू उपसा बंद असतानाही सध्या सुरू असलेला अनधिकृत वाळू उपसा तुमच्या आशीर्वादाने सुरू आहे का असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी प्रांत व तहसीलदार यांना केला. दररोज सुमारे ८० हून अधिक डंपर मधून वाळूची वाहतूक होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाळू उपसा बंद असेल तर नौका खाडीपात्रात कशा असा प्रश्न उपस्थित करत या नौका पकडून जप्त कराव्यात किंवा नष्ट कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर प्रांत ऐश्वर्या काळुशे यांनी नौका नष्ट करणे तांत्रिक दृष्ट्या अडचणीचे असल्याने या नौका जप्त करण्याची कार्यवाही आपण करू. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.
कालावल खाडीकिनारी सुमारे दीडशेहून अधिक परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. या कामगारांची प्रशासनाकडून तपासणी झाली आहे का? वाळू उपसा बंद असतानाही हे भैया कामगार अद्यापही या ठिकाणी वास्तव्य करून का आहेत याची तपासणी प्रशासनाने केली आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावर प्रांत ऐश्वर्या काळुशे यांनी पोलीस प्रशासनाला आजच कालावल खाडीपात्रालगत वास्तव्यास असलेल्या सर्व परप्रांतीय कामगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी अनधिकृतरित्या वाळू उपसा होत आहे ते ठिकाण कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई आपण करू असे आश्वासन प्रांत काळुशे यांनी ग्रामस्थांना दिले. याचबरोबर ज्या ठिकाणी परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत सरपंच, तलाठी यांना नोटीसा काढण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनास दिले.
या चर्चेनंतर तळाशील ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी अनधिकृत वाळू उपसा बाबत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत लेखी आश्वासन आणि कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेतली न गेल्यास प्रसंगी आम्ही आत्मदहन करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला. याबाबतचे निवेदन खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना सादर करण्यात आले आहे.
















Subscribe to my channel




