माजी आ. वैभव नाईकांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी : उन्हाची तीव्रता वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात शाळेत ये-जा करताना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत समावेश असून, पावसाचा खंड आणि वाढती उष्णता यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या सत्रातील शाळांमुळे विद्यार्थ्यांना वाढत्या तापमानात प्रवास करावा लागत असल्याचे नाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.
वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सकाळच्या सत्रात शाळा भरवल्यास विद्यार्थ्यांसह पालकांनाही उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.