बाबा मोंडकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


मालवण | कुणाल मांजरेकर
समुद्रातील वादळी वातावरण यामुळे दोन व्हेल मासे मृत अवस्थेत मालवण समुद्रकिनारी वाहत आले असून या माशांचे सांगाडे जतन, संवर्धन करण्याची मागणी पर्यटन व्यावसयिक महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपचे शहर मंडल तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे सांगाडे जतन केल्यास पर्यटन व पर्यावरणदृष्ट्या या जिल्ह्यात पर्यटनासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच समुद्री, जैविक विषयी अभ्यासकांसाठी एक माध्यम निर्माण होईल. प्रदेश अध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तारकर्ली समुद्र किनारी राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून ३ कोटी मंजूर झाले असून यासाठी ६० गुंठे सरकारी पड जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित करून जमीन संपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे पाठविला असून जागा मान्यता अंतिम टप्यात आहे सदर समुद्र किनारी म्युझिअम उभारता येईल. सदर माशांचा पैकी एक सांगाडा सिंधुदुर्ग किल्ला समोरील खडकामध्ये स्थिरावला असून दुसरा व्हेल मासा वायंगणी समुद्री किनारी जेसीबीच्या माध्यमातून पूरला आहे. या ठिकाणी वरून शासनाने तो ताब्यात घेऊन आवश्यक ती केमिकल प्रक्रिया करून माश्याच्या सांगाड्याचे म्युझिअम करावे. त्यामाध्यमातून एक नवीन माहिती केंद्र मालवणला तयार होईल. जिल्हयात दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी अजून एक पर्यटन स्थळ वाढेल. यांसाठी मस्त्यव्यवसाय खाते व कांदळवन खात्याच्या संयुक्त विद्यमाने जतन संवर्धन करण्याचे आदेश देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदनाद्वारे विनंती केल्याची माहिती श्री. मोंडकर यांनी दिली आहे.

Subscribe to my channel




