कणकवलीत ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान; संघटन बांधणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवा; सुभाष देसाई यांचे आवाहन

कणकवली | प्रतिनिधी : जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देत गावागावात संपर्क वाढवा, संघटनेतील रिक्त पदांवर सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती करा आणि नव्या दमाने पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी केले. सत्ता कायमस्वरूपी कोणाच्याही हातात राहत नाही, त्यामुळे प्रामाणिकपणे आणि चिकाटीने काम करत राहिल्यास सत्ताबदल अटळ असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली येथील विजय भवन येथे झाली. यावेळी संघटनात्मक बांधणी, आगामी काळातील पक्षाची भूमिका, गावागावातील जनसंपर्क तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. तालुकाप्रमुखांनी रिक्त पदांसाठी योग्य कार्यकर्त्यांची नावे सुचवावीत, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.

सुभाष देसाई म्हणाले, सध्या पक्षासमोर अनेक अडचणी असल्या तरी जनतेचे प्रश्न घेऊन पक्षाची वाटचाल पुढे सुरू ठेवायची आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश न होता संघटनेसाठी सातत्याने काम करणे आवश्यक आहे. पदाधिकाऱ्यांनी गावागावात दौरे करून जनतेशी थेट संपर्क वाढविला पाहिजे. तरुणांना आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडली, तर जनता ते काम कधीही विसरणार नाही.

बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतीही मोठी राजकीय ताकद हाताशी नसताना ६० वर्षांपूर्वी संघटना उभी केली. त्याच प्रेरणेतून नव्या दमाने संघटना उभारण्याची गरज आहे. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा आयोजित केला जाईल, अशी माहितीही देसाई यांनी दिली.

गटबाजीला थारा नको; एकदिलाने काम करा – अरुण दुधवडकर

जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संघर्षाचा काळ असला तरी येणारा काळ पक्षाचा असेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी आतापासूनच संघटन बांधणी, नवीन सदस्य नोंदणी आणि जनसंपर्कावर भर देणे आवश्यक आहे. गटबाजीला थारा न देता सर्वांनी एकदिलाने आणि एकजुटीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तरुणाईच्या एकजुटीमुळे सरकारला झुकावे लागले – विजय कदम

उपनेते विजय कदम म्हणाले, शिवसेना केवळ सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी काम करणारी संघटना नसून तळागाळातील नागरिकांच्या न्याय-हक्कासाठी लढणारी संघटना आहे. कोकणातील जनतेचे शिवसेनेशी आणि ठाकरे कुटुंबाशी जुने नाते आहे. मागील निवडणुकीत पक्षाचे काही उमेदवार अल्प मताधिक्याने पराभूत झाले; आगामी निवडणुकीत हा फरक भरून काढण्याचे आवाहन त्यांनी केले.तरुणाई आता विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरली असून तिच्या एकजुटीमुळे केंद्र सरकारला झुकावे लागल्याचा दावा कदम यांनी केला. आगामी काळात जनतेचा वाढता असंतोष सरकारविरोधात निर्णायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैठकीला महिला जिल्हासंघटक नीलम पालव, श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संग्राम प्रभुगावकर, रुपेश राऊळ, अमरसेन सावंत, सुनील तेली, लक्ष्मण रावराणे, प्रथमेश सावंत, नंदू शिंदे, रवींद्र जोगल, हरी खोबरेकर, राजन नाईक, राजेश शेटकर, रमेश सावंत, संजय गवस, निलेश चमणकर, बबन बोभाटे, राजू राठोड यांच्यासह महिला आघाडी, युवासेना व विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!