मालवण-पणजी एसटीला पुन्हा हिरवा कंदील; १ सप्टेंबरपासून सेवा पूर्ववत होणार

मालवण-बोरीवली बसही लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न; ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आगार व्यवस्थापक यांची माहिती

मालवण : काही कारणास्तव बंद करण्यात आलेल्या मालवण-पणजी आणि मालवण-बोरीवली एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. त्यानंतर मालवण-पणजी एसटी बस सेवा येत्या १ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिले. तसेच मालवण-बोरीवली बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही सूर्यवंशी यांनी शिष्टमंडळाला दिली.

ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी या दोन्ही एसटी सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून त्यांना महागड्या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी परवडणारी आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने बंद झालेल्या दोन्ही बस सेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती. त्यातील मालवण-पणजी सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी उपशहरप्रमुख किरण चव्हाण, गणेश चव्हाण, सुरेश मडये, दत्ता पोईपकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!