सिंधुदुर्ग किल्याच्या बुरुजाला भगदाड, तटबंदीला धोका

केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे किल्ल्याच्या डागडुजीकडे व संवर्धनाकडे दुर्लक्ष

मालवण : येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील भागात दोन नंबरच्या बुरुजाला तळाच्या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. या बुरुजाचे आजूबाजूचे दगडही ढासळण्याच्या स्थितीत असून, तटबंदीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा युनेस्को च्या यादीत झळकला असताना देखील किल्ल्याच्या डागडुजीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

किल्ल्याच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूला थेट समुद्राच्या लाटांचा मोठा मारा होत असतो. त्यामुळे त्या भागातील काही भिंतींना तडे जाणे साहजिकच आहे. मात्र, आता ज्या पूर्वेकडील भागात लाटांचा मारा अजिबात नाही, तिथेही तटबंदी निखळू लागल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. स्थानिक रहिवासी मंगेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश आहे. असे असतानाही केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे किल्ल्याच्या डागडुजीकडे व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. तटबंदीच्या बुरुजाचे उखडलेले दगड तातडीने दुरुस्त न केल्यास पावसाळ्यात संपूर्ण बुरुज ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झालेल्या या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी वेळेत करणे गरजेचे असताना, पुरातत्त्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा वारसा धोक्यात आला आहे. किल्ल्याला भेट देण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक येत असतात. बुरुजाची भिंत कमकुवत झाल्याने आणि तिथले अवजड दगड कधीही ढासळण्याच्या स्थितीत असल्याने, येथे फिरणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने दुरुस्ती काम हाती घेणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!