कुडाळात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना-महाविकास आघाडी आक्रमक

राष्ट्रपतींकडे राजीनाम्याची मागणी; वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले असून, त्याची प्रत कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे सुपूर्द करून ते राष्ट्रपतींकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.

कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’ तसेच त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या घोषणा देत निवडणूक प्रक्रियेबाबत पक्षाची भूमिका मांडली.

वैभव नाईक म्हणाले की, कुडाळ विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत मतदानात सुमारे २० हजारांची वाढ झाली होती. सध्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली असून काही मतदारांच्या नोंदींमध्ये त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीतील वाढीव मतदानाच्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत इतर दोन निवडणूक आयुक्तांनीही आक्षेप घेतल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी शांततेच्या मार्गाने हे निवेदन देण्यात येत असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. मुंबईत ४ ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली जनमोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवेदनात गंभीर आरोप; निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी

राष्ट्रपतींना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैली आणि निर्णयांवर निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी लिखित आक्षेप नोंदवल्याचा दावा करण्यात आला आहे. आयोगातील निर्णय प्रक्रियेत या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून काही निर्णय एकतर्फी पद्धतीने घेतल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीने निवेदनाद्वारे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याबरोबरच, त्यांच्या कार्यकाळात कथित ‘वोटचोरी’ झाल्याचा आरोप असलेल्या निवडणुकांची चौकशी करून त्या रद्द करून पुन्हा घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्यासह शिवसेना, युवासेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!