रक्षाबंधनासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग सज्ज; राखी वेळेत पोहोचविण्यासाठी विशेष सेवा

सिंधुदुर्गनगरी : रक्षाबंधनाच्या सणानिमित्त भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये जलरोधक राखी लिफाफे उपलब्ध करून देण्यात आले असून, राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्टची जलद आणि सुरक्षित सेवाही उपलब्ध आहे.

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत डाक सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विभागामार्फत विशेष ग्राहक संपर्क, विक्री आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना जलरोधक राखी लिफाफे, स्पीड पोस्ट, पार्सल सेवा तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बुक केलेल्या स्पीड पोस्टचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध असून, ग्राहकांच्या सोयीसाठी घरपोच संकलनाची सेवाही देण्यात येत आहे. पोस्टमनमार्फत ग्राहकांच्या दारी जाऊन राखी किंवा पार्सल संकलित करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना डाक कार्यालयात जाण्याचीही आवश्यकता भासणार नाही.

‘डाक सेवा-जनसेवा’ या भावनेतून सिंधुदुर्ग डाक विभाग प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा हा धागा जलद, सुरक्षित आणि विश्वासार्हपणे भावंडांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे.राखी पाठविण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता नागरिकांनी आपल्या भावंडांपर्यंत प्रेमाचा संदेश वेळेत पोहोचविण्यासाठी आजच जवळच्या डाक कार्यालयात राखी बुक करावी, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!