राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला होणार मतमोजणी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट राज्य

: राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असून यामध्ये नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

आपल्या कोणत्याच अधिनियमात व्हीव्हीपॅटची तरतूद नाही. आपल्या काही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मल्टीमेंबर, मल्टीपोस्ट तरतूद आहे. महापालिकांमध्ये चार सदस्य आहेत. नगरपरिषदांमध्ये दोन सदस्य आहेत, जिल्हा परिषदांमध्ये एक विभाग-एक गण आहे. त्यामुळे अशा मल्टीमेंबर-मल्टीपोस्ट व्यवस्थेसाठी व्हीव्हीपॅट मशीन सध्या अस्तित्वात नाही. सर्व राज्य निवडणूक आयोगांची एक समिती यासाठी स्थापन झाली असून त्या समितीने व्हीव्हीपॅट स्पेसिफिकेशन अजून ठरवलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आता होत असलेल्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करता येणार नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. टूल विकसित करून संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्याची चौकशी निवडणूक अधिकारी करतील आणि तो कुठे मतदान करणार याची आधीच माहिती घेतली जाईल. जे मतदार याला प्रतिसाद देणार नाहीत ते मतदान करण्यास आल्यास त्यांच्याकडून डिक्लेरेशन भरून घेतले जाईल. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज भरता येणार असून अखेरची मुदत १७ नोव्हेंबर असणार आहे

error: Content is protected !!